मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. अनेक कलाकार देखील आता राजकारणात नवीन भूमिका वठवण्यासाठी राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत. याच अंतर्गत दिवंगत मराठी अभिनेते निळू फुले यांच्या मुलीने मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. गार्गी यांनी ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात एन्ट्री केल्यामुळं राष्ट्रवादीकडून त्यांना मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गार्गी फुलेने राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला होता.
अजित पवारांसोबत काम करण्याची इच्छा
अभिनेत्री गार्गी फुले यांनी यावेळी अजित पवारांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ”मला अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी व विचार आहेत त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस न्याय देईल.” ”राष्ट्रवादी पक्षासोबत मला काम करण्याचा आनंद आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार या सर्वांचे माझ्या वडिलांशी चांगले संबंध होते. आता मला पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे”, असं त्या म्हणाल्या. आता नुसतं किनाऱ्यावर बसून पाहायचं नाही आहे. मुख्य प्रवाहात येऊन काम करायचं मी ठरवलं आहे. तरूणांना वाटतं राजकारणात यावं आणि बदल करावा. माझाही तोच प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे काम चांगले
राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना अभिनेत्री गार्गी फुले म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्ष सर्वस्तरावर चांगलं काम करत आहे. विशेषतः महिलांसाठी राष्ट्रवादीने चांगलं काम केल्यामुळं मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता राष्ट्रवादीकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती मी पार पाडण्यास तयार असल्याचंही गार्गी यांनी म्हटलं आहे. भविष्यात पक्षानं तिकीट दिलं तर का नाही लढणार? असंही त्या म्हणाल्या. तसेच मी किती सक्षम आहे हे पक्ष ठरवेल. माझ्यावर कुठलीही जबाबदारी दिली तरी मी योग्यरित्या पाळेन.
अभिनयाची दमदार कारकीर्द
गार्गी फुले या उच्चशिक्षित आहेत, त्यांनी महिला सुरक्षेविषयीच्या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे. गार्गी फुले यांनी १९९८ साली प्रायोगिक नाटकांतून मनोरंजन सृष्टीत प्रवेश केला होता. सत्यदेव दुबे यांच्याकडेही त्यांनी शिक्षण घेतले आहे. ‘समन्वय’ नाट्यसंस्थेच्याही प्रायोगिक नाटकातून त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘मळभ’, ‘कोवळी उन्हं’, ‘श्रीमंत’, ‘वासंती’, ‘जीर्णनी’, ‘सुदामा के चावल’, ‘सोनाटा’ अशा नाटकांमधून त्यांनी काम केलं आहेत. त्या सोशल मीडिया आणि वेबसिरिजमध्येही दिसतात. गार्गी फुले या इन्टाग्रामवरही सक्रिय आहेत.
Marathi Actress Gargi Phule Join Politics NCP