इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार अनेक गोष्टी करत असतात. आपल्या लाडक्या कलाकारांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहणं त्यांच्या चाहत्यांना आवडत असतं. कलाकारांचं आयुष्य अष्टपैलू असतं. खऱ्या आयुष्यात देखील अनेक भूमिका त्याला निभवाव्या लागतात. या सगळ्यापासून, धकाधकीच्या आयुष्यातून दूर, निसर्गात खऱ्याखुऱ्या शांततेचा आनंद घेणं कुणाला आवडणार नाही. अशीच मनोरंजन जगतापासून लांब जात क्षणभर विश्रांती घेत एक प्रसिद्ध अभिनेत्री सध्या शेतात रमली आहे. ही आहे आपली अप्सरा म्हणजेच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सध्या ती आपल्या शेतात शेतीचा आनंद घेताना दिसते आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध आहे. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातील तिचे नृत्य, सौंदर्य, उत्तम अभिनय यामुळे ती मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा म्हणून नावारूपास आली. सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरशी आपली लग्नगाठ बांधली. सध्या ती आणि तिचे कुटुंबिय पंजाबमध्ये गेले आहेत. तेथीलच एक तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आपल्या नवऱ्याबरोबर शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. ‘घर की खेती.. गहू’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे. तिने लिहले आहे की तिच्या नवऱ्याला त्यांचे शेत बघण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्हाला याचा आनंद घेता येत आहे. या शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओमध्ये ती स्वतः ट्रॅक्टर चालवताना दिसते आहे. यासोबतच त्यांचे शेतही पाहत आहे.
सोनाली सध्या पंजाबमध्ये असून तिने नुकतीच वाघा बॉर्डरला भेट दिली आहे. तिकडेच फोटो शेअर केले आहेत. सोनाली मराठी चित्रपटांमध्ये सक्रीय आहे तर तिचा नवरा कुणाल बेनोडेकर हा दुबईत स्थायिक असतो. नुकताच त्यांचा विवाहसोहळा लंडन येथे थाटामाटात पार पडला. त्याआधी त्यांनी दुबईत साखरपुडा केला होता. दरम्यान, सोनालीसह आणखी काही कलाकार गायक हे आपल्या शेतात रमताना दिसले आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वातील अनेक मंडळी ‘गड्या आपला गाव लय भारी’ म्हणत शेतीचा आंनद घेताना दिसत असल्याचे चित्र आहे.
Marathi Actress Farming Tractor Driving Video Viral