इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक गुणी अभिनेत्री आहेत. त्यातील काही नेहमीच चर्चेत असतात. तर काही एखाद दोन मालिकांनंतर विस्मृतीत जातात. अदिती सारंगधर ही अशीच एक गुणी अभिनेत्री. ‘वादळवाट’ मालिकेतून ती अत्यंत चर्चेत आली. त्यानंतरच्या तिच्या मालिका फार चर्चेत नसल्या तरी आजही ती ‘वादळवाट’साठीच ओळखली जाते. नुकतेच तिने आपल्या क्रिकेटवाली लव्ह स्टोरीची माहिती दिली आहे.
या क्रिकेटपटूवर होते अदितीचे प्रेम
काही वर्षांपूर्वी अदितीने एका क्रिकेटरला प्रपोज केल्याचा खुलासा तिने केला आहे. एका मुलाखतीत तिने ही माहिती दिली. मी पहिल्यांदा अजित आगरकरला प्रपोज केलं होतं. मला तो खूप आवडायचा. ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर मी त्याच्यासाठी तासनतास थांबायचे, असं अदिती सांगते. अजित आगरकरसाठी मी खूप पत्र लिहायचे आणि आईला द्यायचे. आई म्हणायची मी पोस्ट करते. त्या पत्रांपैकी एका पत्रामध्ये माझे एक लव्ह लेटरही होतं. मला तू खूप आवडतोस आणि मला तुझ्याबरोबर डेटवर जायचं आहे असं मी त्या पत्रात लिहिलं होतं. मी त्याला लग्नासाठी वगैरे प्रपोज केलं नव्हतं. माझी पत्र पाहून, आई म्हणायची मी तुझी पत्र देते पण एक दिवस माझा खण आवरताना ती सगळी पत्र मला त्यात मिळाली. आईने ती पत्र पोस्ट केलीच नव्हती. त्यामुळे ते डेट प्रपोजल माझ्याकडेच राहिलं.”
कामाचे प्रेक्षकांकडून कौतुक
अभिनेत्री अदिती सारंगधर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने अनेक मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. अदितीचा चाहतावर्ग मोठा आहे. अदिती ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या अदिती ‘चर्चा तर होणारच’ या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या तिच्या नाटकाला आणि यातील तिच्या कामाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Marathi Actress Aditi Sarangdhar Love story