इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक मालिका तसेच सिनेमांमधून आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले अभिनेते म्हणजे विलास उजवणे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते या मनोरंजन विश्वापासून लांब असल्याचे दिसते आहे. बऱ्याच काळापासून त्यांचा अभिनय असलेली मालिका काही दिसलेली नाही. यामुळे यासंदर्भात माहिती घेतली असता, धक्कादायक माहिती समोर आली. अभिनेते विलास उजवणे काही दिवसांपासून आजारी आहेत. आजार गंभीर असून आता त्यांनी आर्थिक मदतीसाठीच आवाहन केलं आहे.
प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रामुख्याने खलनायकी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या तरी, त्या देखील त्यांनी ताकदीने निभावल्या. ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ अशा मालिकांमधून घराघरांत पोहचलेले विलास यांनी वैविध्यपूर्ण पात्र साकारुन अनेक भूमिका गाजवल्या. सध्या त्यांच्या तब्येतीविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्या मित्राने अभिनेत्यासाठी आर्थिक आवाहन करत एक पोस्ट शेअर केली आहे.
तब्बल सहा वर्षांपासून डॉ. उजवणे हे ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजाराशी लढता लढता त्यांची संपूर्ण जमा खर्च झाली आहे. त्यातच त्यांना आता हृदयाचा त्रासही सुरू झाला आहे. या सर्व गोष्टींना खंबीरपणे तोंड देत असतानाच डॉ. विलास यांना कावीळ झाली. सध्या ते रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर तात्काळ एक शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी विलास यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
https://www.facebook.com/raju.kulkarni.568632/posts/1311997106202208
विलास यांचे जवळचे मित्र राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, ‘हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्ष ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणाऱ्या हा वाघ थोडा थकला आहे. अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करून बसला आणि ती रक्कम थोडी थोडकी नाही. चांगली सुधारणा होत आहे असे वाटत होते, कुठे परीक्षक तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून चाहत्यांना दिलासा देत होते. लवकरच आपली सेकंड इनिंग चालू करणार असं वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली.’ पुढे ते म्हणतात, ‘डॉक्टरांच्या वेदना आपण घेऊ शकत नाही पण प्रेमाची आर्थिक मदत आपण सर्वजण नक्कीच करू शकतो. हे आवाहन मी (राजू कुलकर्णी) डॉक्टरांच्या पत्नी अंजली वहिनी यांच्या अनुमतीने करत आहे. खाली डॉक्टरांचे अकाउंट डिटेल्स देत आहे, तसेच वेळोवेळी डॉक्टरांच्या प्रकृती, त्यांची चालू असलेली ट्रीटमेंट या विषयीची अपडेट मी फेसबुक माध्यमातून आपणास देत राहीन.’
१. डॉ. विलास उजवणे- सारस्वत को.ऑप. बँक अकाउंट नंबर- 130200100009758. IFSC SRCB0000130
२. डॉ. विलास उजवणे- सारस्वत को.ऑप. बँक अकाउंट नंबर- 005200100030302. IFSC SRCB0000005
अशी ही कुलकर्णी यांची पोस्ट आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आजारपणाची बातमी ऐकून चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त होते आहे. गेली १८ वर्षे राजू कुलकर्णी आणि डॉ. उजवणे यांचे स्नेहबंध आहेत. तालमीच्या निमित्ताने ओळख झाली आणि ती आजवर टिकली. त्यांच्यासाठी डॉ. म्हणजे घरातलाच माणूस. याच कळकळीतून त्यांनी हे आवाहन केले आहे.
नाट्य सिने कलाकार डॉ. विलास उजवणे आजारी आहेत, मदतीची गरज आहे, त्या बद्दलची पोस्ट त्यांच्या मित्राने केली आहे, माझ्या परीने मी मदत करेन, बाकीच्यांनीहि करावी हि नम्र विनंती.
Dr Villas Ujawane Saraswat Co-operative Bank. A/C No. 130200100009758. IFSC SRCB0000130
— Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@Kshitij_P) December 12, 2022
Marathi Actor Vilas Ujawane Medical Help Appeal