पुणे( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (वय ७७) यांचे अखेर निधन झाले आहे. त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून नाजूक होती. दोन दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. काल सकाळी त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अनेक दशकं विक्रम गोखले यांनी गाजवली आहे. आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्वाने वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सातत्याने चढउतार बघायला मिळाले. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टही देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होण्याची अपेक्षा त्यांचे कुटुंबिय बाळगून होते. ते डोळे उघडत होते व हातपाय हलवत होते. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघेल, त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी काल सकाळीच दिली होती. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. ते उपचारांना प्रतिसादही देत होते. मात्र, आज दुपारी त्यांचे निधन झाले.
विक्रम गोखले यांनी हम दिल दे चुके सनम, हे राम, तुम बिन, हिचकी आणि मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या दमदार अभिनयासाठी प्रशंसा मिळवली. या वर्षी १७ जून रोजी प्रदर्शित झालेला शिल्पा शेट्टीचा निकम्मा थी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्याच्या दमदार अभिनयासाठी त्यांना २०१० मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ‘अनुमती’ या मराठी चित्रपटासाठी देण्यात आला. विक्रम गोखले हे एक चांगले आणि नावाजलेले अभिनेते तर होतेच, पण ते पुण्यात अभिनयाची शाळाही चालवत होते.
विक्रम गोखले हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीसह पुण्यात राहत होते. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबात, त्यांचे आजी आणि वडील मराठी चित्रपट आणि रंगमंचावरील सुप्रसिद्ध अभिनेते होते. विक्रम गोखले यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांचा दमदार आवाज आणि त्यांचे मोठे डोळे कोणत्याही कंटाळवाण्या व्यक्तिरेखेत प्राण फुंकत असत.
ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांचे थोड्याच वेळापूर्वी निधन झाले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात आज संध्याकाळी चारपासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर वैकुंठात अंत्यसंस्कार होतील.#पुणे #Pune pic.twitter.com/FilnOqQYeH
— Samrat Phadnis (@PSamratSakal) November 26, 2022
Marathi Actor Vikram Gokhale Passed Away