इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आरे येथे मेट्रोचे कारशेड करण्याचे नक्की झाले, तसा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. मात्र, यानिमित्ताने तेथे कारशेड होऊ नये, यासाठी कार्यरत आंदोलकांवर टीका करणारे ट्विट मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन याने केले. आणि तो मीडियावर ट्रोल होऊ लागला.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुमीत राघवनला ओळखले जाते. सोशल मीडियावर तो कायमच चर्चेत असतो. गोरेगाव येथील आरे कारशेडला सुमीतचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. नुकतंच त्याने यासंदर्भात एका ट्वीट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये सुमितने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फ्रान्समधील असावा. वातावरण बदलाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात काही जण आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहेत. त्याला फ्रेंचचे काही नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना असं कॅप्शन आहे. सुमितने आपल्या ट्विटमध्ये हाच व्हिडीओ रिट्विट केला आहे. यासोबतच तो म्हणतो, “आरेच्या आंदोलकांबरोबर आपणही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले होते, बोगस फालतू लोक. यांना ना काम ना धाम”, असे त्याने हा व्हिडीओ रिट्वीट करताना म्हटलं आहे.
यावरुन ट्विटरवर तो भलताच ट्रोल होतो आहे. एका नेटकऱ्याने दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचे एक मीम शेअर केले आहे. या मिमवर ‘तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून पण नीच आहेस’, असा एक डायलॉग लिहिण्यात आला आहे. सुमितने त्या नेटकऱ्याचे ट्वीट पाहताच त्याला हसतच टोला लगावला आहे. “ माझ्यावर टीका करण्यासाठी शेवटी आधार तुला माझ्याच व्यवसायाचा घ्यावा लागला, असं तो यात म्हणतो. स्वतःचं काहीच नसलं की असं होतं.. असो. विक्रम काकांना त्या निमित्ताने तू श्रद्धांजली दिली.. मोठा नट होता..”, असेही सुमितने यावेळी म्हटले आहे.
त्यावर त्या नेटकऱ्याने “तुम्हा दोघांना हा डायलॉग चपखल लागू होतो म्हणून ट्विटला आहे. आणि तो बरोबर काळजात लागला आहे, हे तुमच्या बोलण्यावरून दिसत आहे”, असे म्हटले आहे. या दोघांचे हे ट्विटबाण इथेच थांबत नाहीत. पुढे सुमित म्हणतो, “विक्रम काका ह्यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालंय आणि हे तुझे विचार….एक काम कर आई बाबांना किंवा घरच्या मोठ्यांना हे तुझं ट्विट ऐकव. मग बघ त्यांच्या काळजाला किती लागतं ते आणि त्यांची प्रतिक्रिया रेकॉर्ड करून पाठव. मी इथेच आहे ..”
यावर तो नेटकरी म्हणाला, “तुमच्या पत्नीला आणि मुलाबाळांना तुम्ही मूळ ट्विटमधून जी विकृती दाखवली आहे ते व्यक्त करून दाखवा. तुमच्या घरच्यांची मान शरमेने खाली जाईल.” यावर सुमीतने “मित्रा गेलेल्या माणसाबद्दल तू बोलला आहेस. उगाच सारवासारव करू नकोस”, असे सांगितले आहे. तसेच “ताळतंत्र सोडून बोलण्याचा उत्तम नमुना बघा. विषय सुरू होता आरे कार शेडचा.. आणि ह्याने कुठल्या थराला नेला द्वेष. काही गरजच नव्हती इतकं विषारी होण्याची. स्वतःच्या मनासारखं झालं नाही तर गेलेल्या माणसाला देखील सोडत नाहीत हे लोक”, असेही सुमीतने ट्वीट करत म्हटले आहे.
त्यावर त्या नेटकऱ्याने देखील संताप व्यक्त करत ट्वीट केले आहे. “ताळतंत्र सोडून हिंस्त्र भाषा तुम्ही मूळ ट्विटमध्ये वापरली. त्याला एका मिम टेम्प्लेटने उत्तर दिले तर आकांडतांडव करायला लागलात. मग हे नाही जमले तर मी कसा सभ्य आहे अन समोरचा कसा मला त्रास देतोय हे व्हिक्टिम कार्ड खेळायला सुरुवात केली. कमाल करता ब्वा”, असे म्हटले आहे. यावर सुमित म्हणतो, “व्हिक्टिम कार्ड.. मी? गेलेल्या माणसाला सोडत नाहीस वर मला नीच आणि भिकारडा म्हणालास.. असो .. मुद्दा काय होता? आरे..बरोबर? संपला विषय, म्हणजे विषय संपलाच. कारण आरे कारशेड तिथेच होणार.. चल.. पुढच्या वेळेला मुद्दा धरून बोल.”, असे सुमीतने म्हटले आहे.
त्यावर नेटकऱ्याने “मिम्स टेम्प्लेटचा घाव अजून काही दिवस भरणार नाही असे एकंदर दिसते आहे. घाव बरा होईपर्यंत मिम्स काय असते शिकून घ्या आणि आरे कारशेड होईल की नाही तो पुढचा भाग राहिला, पण आंदोलकांना चिरडून टाकायची तुमच्या मनातील हिंस्त्र विकृती सगळ्यांनी पाहिली आहे”, असे सुमितला सुनावले आहे. त्यावर उत्तर देताना सुमीतने त्याला खोचक शब्दात प्रश्न विचारला आहे. “चिरडून???? अरे बाळा शांत झोप आता . बरळू नकोस.. बरं मेट्रो सुरू झाल्यावर प्रवास कर … बरं पोटापाण्यासाठी काय करतोस? फक्त कुतूहल म्हणून विचारतोय…”, असे सुमितने म्हटले आहे.
“मेट्रोला कुणी विरोध करत नाही, विरोध कारशेड जिथे होतोय त्याला आहे. हे असले बाळबोध लॉजिक वापरून स्वतःच्या बुद्धीचे ओंगळवाणे प्रदर्शन करू नका. बाकी कुतूहल म्हणून हा फक्त…तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की पोटापाण्यासाठी हे सगळं करताय? जस्ट कुतूहल म्हणून विचारतोय”, असं सुमितच्याच भाषेत प्रत्युत्तर या नेटकऱ्याने दिले आहे. त्यावर सुमितने काहीही उत्तर दिलेले नाही. सुमितच्या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावर टीका केली आहे. असे असले तरी सध्या त्याचे आणि या नेटकऱ्यामध्ये रंगलेले ट्वीटर वॉर चांगलेच चर्चेत आहे.
https://twitter.com/sumrag/status/1598264548787879938?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
Marathi Actor Sumeet Raghavan Troll in Social Media
Entertainment Aarey Forest Metro Car Shed Environment Activist Tree