इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याचे दिवस हे सेलिब्रिटींच्या लग्नसराईचे आहेत. तुळशीचं लग्न झालं की, लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. तसेच सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाचे दिवस सुरू आहेत. राणादा आणि पाठक बाई यांनी नुकतीच खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्यापाठोपाठच आता ‘बाळूमामा’फेम अभिनेता सुमित पुसावळे हा देखील लग्नबंधनात अडकला आहे. ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत सुमितची मध्यवर्ती भूमिका आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सुमितने त्याच्या खऱ्या आयुष्यातील सत्यभामा म्हणून जळगावच्या मोनिका महाजनची निवड केली. सांगोला येथे नुकताच सुमीत आणि मोनिका यांचं दणक्यात लग्न झालं. सुमितच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुमित आणि मोनिका यांचं ऍरेंज मॅरेज आहे. मोनिका ही मूळची जळगावची असून ती आयटी सेक्टरमध्ये कामाला आहे. नोकरीच्या निमित्ताने मोनिका औरंगाबादला राहते. तर औरंगाबाद हे सुमितचं मूळ गाव आहे. १३ डिसेंबरला सुमितचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम झाला. आधीच राजबिंडा असलेला सुमित पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात अधिकच उठून दिसत होता. तर लग्नासाठी सुमितने मोती रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाची धोती परिधान केली होती. तर मोनिका लाल रंगाच्या पैठणीत होती.
मलिकेमुळे सुमित चर्चेत असतोच पण १६ नोव्हेंबरला त्याने मुलीच्या हातात हात असलेला फोटो शेअर केला होता. त्याच्या इन्स्टापेजवर शेअर झालेल्या या फोटोतून त्याच्या आयुष्यात एक मुलगी आल्याची भनक चाहत्यांना लागली. त्यानंतर लगेचच सुमितने मोनिकासोबत प्री-वेडिंग फोटो शूट करत त्यांचे फोटो शेअर केले. ‘उनका हात पकडना तो एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था’, अशी मस्त कॅप्शन या फोटोला दिली होती. आणि त्यानंतर लगेचच तिने होकार दिला, असं म्हणत त्याने दुसरा फोटो शेअर केला. यानंतरच सुमित लग्न करत असल्याची बातमी पसरली. लग्न ठरल्याची बातमी दिल्यानंतर महिन्याभराच्या आतच सुमित आणि मोनिकाच्या लग्नाचा बार उडाला आहे.
या दोघांचा सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला. या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. तर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
सुमितने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारल्या असल्या तरी त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती बाळूमामा या भूमिकेमुळेच. जवळपास तीन वर्षांपासून ही मालिका सुरू आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या मालिकेचा टीआरपीही चांगला आहे. बाळुमामांच्या तरूणपणापासून ते त्यांच्या वार्धक्यापर्यंतच्या अनेक छटा दाखवण्यात अभिनेता सुमित पुसावळे याने बाजी मारली आहे.
Marathi Actor Sumeet Pusavale Wedding Ceremony
Balu Mamachya Navana Fame Entertainment