इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साहित्य क्षेत्रातील अनुभव, विचारांची देवाणघेवाण करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे साहित्य संमेलन. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले लोक एकत्र येऊन येथे विचारांचे आदान-प्रदान करतात. आणि भाषेच्या समृद्धीत अधिक भर घालतात.
जगभरात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे आयोजित केलेले विश्व मराठी संमेलन नुकतेच मुंबई येथे पार पडले. या विश्व मराठी संमेलनाचा अखेरचा दिवस गाजला तो विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या मांदियाळीने. आपापल्या क्षेत्रातील दादा असलेल्या लोकांनी यात सहभाग घेत या क्षेत्रातील प्रवासाबाबत दिग्गजांनी अनुभव कथन केले. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज अंजली भागवत, अभिनेते-लेखक संजय मोने, चित्रकार सुहास बहुलकर, लेखक, आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा समावेश होता.
अभिनयातील कारकीर्दीबद्दल बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला की, खरे तर मला पोलीस व्हायचे होते; परंतु मी अभिनेता झालो. बालपणापासून माझे पोलीस होण्यासाठीच प्रयत्न सुरू होते. मात्र, रूपारेल कॉलेजच्या नाट्य संस्कृतीने माझ्यातील अभिनेत्याला वाव दिला. रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या कलाकारांना आत्मविश्वास दिला. हाच आत्मविश्वास मला आजही उभारी देतो. चित्रकार सुहास बहुलकर म्हणाले की, चार वर्षांचा असताना मी एक चित्र काढले. ते पाहून वडिलांना माझ्यातील चित्रकार दिसला. त्यावेळी फार काही कळत होते असे नाही पण आज चित्रकला हेच सर्वस्व बनले आहे.
प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत हिनेही आपल्या आठवणी शेअर केल्या. मला खेळांत बालपणापासून रुची होती. त्यावेळी खेळाकडे करिअर म्हणून बघितले जात नव्हते, पण त्यातच नाव कमवायचे हे मी नक्की केले होते. या दृढ निश्चयामुळेच अंजलीने तीनवेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तर अच्युत गोडबोले म्हणाले की, खरे तर मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे अपघाताने ढकलला गेलो. गरज होती म्हणून नोकरी केली. ४९ पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचता आले. तांत्रिक भाषा सोपी करून सांगण्यासाठी सगळी पुस्तके मराठीत लिहिली आहेत. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे.
Marathi Actor Siddhartha Jadhav Tell About Career
Entertainment