इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोठ्या पडद्यावरचे असोत किंवा छोट्या पडद्यावरचे, या कलाकारांना जबरदस्त फॅन फॉलोईंग असतं. मुख्य भूमिकेत असलेल्या नायक – नायिकांना तर जरा जास्तच. आणि केवळ आपण सामान्य प्रेक्षकच यांचे चाहते असतो, असं नाही बरं. तर कलाकार देखील एकमेकांचे फॅन असतात. आपल्या आवडत्या अभिनेता – अभिनेत्रीला भेटण्यासाठी, त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी अनेकदा कलाकार देखील प्रयत्नशील असतात. नुकताच याचा प्रत्यय ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या सेटवर आला.
या मालिकेतील यश – नेहा आणि परीला तर प्रेक्षकांचे प्रेम मिळतेच. पण यशच्या बरोबरीने त्याचा जिवलग मित्र समीर अर्थात संकर्षण कऱ्हाडे यालाही अनेकांची पसंती मिळते आहे. संकर्षणचा धाकटा भाऊ अधोक्षज हा देखील हळुहळू या क्षेत्रात स्थिरावतो आहे. मालिका, नाटकांतून तो आपला जम बसवण्याचा प्रयत्न करतो आहे. नुकतीच अधोक्षजने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. त्याला कारणही तेवढंच खास होतं.
अधोक्षज अर्थात संकर्षणचा भाऊ ज्या मालिकेत काम करतो त्याच मालिकेत त्याचा आवडता अभिनेताही काम करतो हे त्याच्यासाठी खूप खास ठरले. अधोक्षज हा श्रेयस तळपदचा खूप मोठा चाहता आहे. आणि हीच संधी साधत त्याने मालिकेच्या सेटवर हजेरी लावली. श्रेयसला पाहून त्याला काय वाटले, ते त्याने सोशल मीडियावर व्यक्त केले.
विशेष म्हणजे, यावेळी अधोक्षजने आपल्या बाबांच्या आठवणींचा खजिना उलगडला. अधोक्षज म्हणाला की, २००५ साल. तेव्हा बाबा बँकेत काम करत करत प्रायोगिक नाटकात आणि कधीकधी मराठी पिक्चरमध्ये काम करायचे. मला आठवतंय, एकदा बाबा रजा घेऊन आठ दिवसांसाठी मुंबईला एका मराठी पिक््चरच्या शूटिंगसाठी गेले होते. पिक्चरचं नाव होतं ‘झुळूक’. त्यावेळी पिक्चर, शूटिंग ह्या सगळ्या गोष्टींचा खूप अप्रूप वाटायचं ( ते आजही आहेच). “आपले बाबा पिक्चरमध्ये काम करत आहेत’ ही फिलिंगच खूप भारी होती. मुंबईला गेल्यावर बाबांचा फोन आला, त्यांच्याकडून कळलं की, पिक्चरमध्ये डॉक्टर गिरीश ओक, ऐश्रर्या नारकर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. श्रेयस तळपदे हे नाव माझ्यासाठी अगदीच नवीन होतं. बाबा तेव्हा बरेचदा सांगायचे, श्रेयस तळपदे शूटिंग दरम्यान बॉलिंगची प्रॅक्टिस करायचा. त्यानंतर काहीच महिन्यांनी श्रेयस तळपदेचा ‘इक्बाल’ नावाचा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा ती प्रॅक्टिस कशासाठी होती, ते समजलं.
‘इक्बाल’ पाहिला आणि तेव्हापासून मी त्याचा फॅन झालो. मी सुद्धा क्रिकेट खेळायचो. त्यामुळे त्याची भूमिका मला जास्तच जवळची वाटत असावी, असं अधोक्षज सांगतो. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात त्याच्या ‘आशायें’ गाण्यानं होते. नंतरही त्याचं प्रत्येक काम मी मन लावून पाहिले. माझ्या बाबांनी इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम केले हे फिलिंग खूप भारी असते. मला पण कधीतरी त्याला भेटता यावं अशी इच्छा तेंव्हापासून मनामध्ये होती. *इक्बाल’नंतर मात्र तो हिंदी चित्रपटसृष्टीतच जास्त कार्यरत राहिला आणि अनेक वर्षं त्याला भेटण्याची इच्छा फक्त इच्छाच राहिली.
अखेर पंधरा वर्षांनंतर, संकर्षणच्या निमित्तानं, ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवर ‘दि श्रेयस तळपदे’च्या भेटीचा योग आला. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, त्याचे आश्वासक स्माईल आणि त्याचा साधेपणा याचं कॉम्बिनेशन पाहून मला खूप छान वाटले आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरला नाही. ही त्याची आणि माझी पहिली भेट. पुढे आमच्या घरगुती समारंभाचा भाग होण्याइतका तो जवळचा झाला आणि पर्यायाने ‘द श्रेयस तळपदे’चा ‘श्रेयस दादा’ झाला. भविष्यात त्याच्यासोबत कामं करण्याची संधी मिळेल, या ‘आशायें’ आहेतच, पण ही भेट खूप खास होती, हे मात्र खरं! अशा शब्दात अधोक्षजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Marathi Actor Sankarshan Karhade Family