पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे, रुबाबदार नट अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांची शुक्रवार, १४ जुलै रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अशा एक्झिटने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
आपल्या अभिनयाने आणि देखण्या लुक्सनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या नटाने सुरुवातीच्या काळात पोटापाण्यासाठी म्हणून मुंबईत चक्क टॅक्सी चालवली होती, हे तुम्हाला माहीत आहे का? होय, हे खरे आहे. अभिनयाच्या प्रेमापोटी चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमवायला आलेल्या महाजनी यांनी संघर्षाच्या काळात चक्क टॅक्सी देखील चालवली आहे. ते टॅक्सी चालवतात हे कळल्यावर अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध देखील तोडले होते.
अभिनय क्षेत्रात संधी मिळावी म्हणून दिवसा ते वेगवेगळ्या निर्मात्यांची भेट घ्यायचे. आणि रात्री टॅक्सी चालवून पोट भरायचे. अशाच निर्मात्यांची भेटगाठ घेतल्यामुळे त्यांना काही मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका मिळाल्या होत्या. व्ही. शांताराम यांच्या ‘झुंज’ चित्रपटातून त्यांनी खऱ्या अर्थाने कलाक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांना ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे चित्रपट मिळत गेले. त्यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेष म्हणजे नट म्हणून यशस्वी झाल्यानंतर संबंध तोडलेले सगळे नातेवाईक पुन्हा त्यांच्या आसपास गोळा झाले.
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला, तर त्यांचं बालपण मुंबईत गेले. त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. रवींद्र यांना सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असल्यापासूनच ते स्नेहसंमेलनात अभिनय करत होते. खालसा महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली.
१९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला. आपले देखणेपण आणि अभिनय याच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीतील एक काळ अक्षरशः गाजवला. १९७५ ते १९९० या काळातील ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘झुंज’, ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर ‘बेलभंडार’ आणि ‘अपराध मीच केला’ ही त्यांची नाटकेही गाजली. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली.
१९९० नंतर त्यांनी मुख्य भूमिकांपासून थोडे बाजूला येत चरित्र भूमिका तसेच छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक वेगळी भूमिका स्वीकारत ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी ‘काय राव तुम्ही’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, ‘पानिपत’ अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे देऊळ बंद आणि पानिपत या दोन्ही चित्रपटात त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आणि आजचा आघाडीचा अभिनेता गश्मीर महाजनी देखील होता.
मुख्यमंत्र्यांना दुःख
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.