पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून ओळख असलेल्या रवींद्र महाजनी यांचे शुक्रवार, १४ जुलै रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी चित्रपटसृष्टीसोबतच त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का देऊन गेली आहे. मावळ तालुक्यातील आंबे येथे घरात त्यांचा मृतदेह आढळला आहे. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे कोणीच निकटवर्तीय नसल्याचे समोर आले आहे. ते ७७ वर्षांचे होते. अभिनेता गश्मीर महाजनी त्यांचा मुलगा आहे. रवींद्र यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी तळेगावला रवाना झाला. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे.
रवींद्र महाजनी यांचा मृतदेह त्यासारख्या राहत्या घरात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी घराचा दरवाजा तोडल्यानंतर घरात त्यांचा मृतदेह पडलेला आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. तसेच दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. घरात काहीच हालचाल दिसत नसल्याने, शेजाऱ्यांना शंका आली. आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी जात दरवाजा तोडला. तेव्हा बाथरुमजवळ रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला.
दोन-तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज
रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वीच झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पाय घसरून ते पडले असावेत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.