इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोमवारची सकाळ अत्यंत दुःखद बातमीने झाली. मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचे निधन झाले आहे. काही दिवासांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. जयंत (अण्णा) सावरकर यांचे ठाण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. १०० हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
दमदार अभिनयाने सावरकरांनी प्रेक्षकांचे नेहमीच भरभरून मनोरंजन केले. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत त्यांनी नुकतीच कांचन यांच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या प्रेमळ सासरे ते जीव लावणारे बाबा अशा वडिलधाऱ्या भूमिका खूप गाजल्या.
दमदार कारकीर्द
‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कथा नव्या संसाराची’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ अशा एकापेक्षा एक सरस नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर, ‘वाहिनीची माया,’ ‘पैसा पैसा’, ‘आराम हराम है’ आदी चित्रपट आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’ अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपट किंवा नाटकांमधील त्यांच्या छोट्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे), सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केलं. अभिनयाच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या घराघरांमध्ये ते पोहोचले. ३० हून अधिक हिंदी सिनेमातही त्यांनी काम केले. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जयंत सावरकर यांची निवड झाली होती. काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. शिवाय ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विशेष गाजली.
वयाच्या विसाव्या वर्षी
वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी जयंत सावरकर यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनयाच्या आवडीपोटी त्यांनी अंगावर पडतील ती कामे करण्याचा निर्णय घेतला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला बरीच वर्षे ते बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. मात्र, उदरनिर्वाहासाठी ते नोकरी देखील करत असत. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटीमोठी कामे देखील केली. हळूहळू नाट्यक्षेत्रात त्यांचा जम बसला. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी चांगल्याच गाजवल्या होत्या. १०० हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी १९५४ पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या ७३ व्या वर्षांपर्यंत ते अभिनय करत होते.
देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
आपल्या अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा विविध माध्यमांत अमिट ठसा उमटवणारे, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने केवळ एक उत्तम अभिनेता नाही, तर अनेक कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जयंत सावरकर यांनी चार पिढ्यांसोबत काम केले. त्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांचे विश्व इतके अनुभवसिद्ध होते की त्यातून नव्या पिढ्या घडत होत्या. एक उर्जावान आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला अभिनेता आपण गमावला आहे. त्यांनी साकारलेला अंतू बर्वा कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !