इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काळ जसा बदलत जातो आणि नवनवीन माणसे एखाद्या क्षेत्रात पुढे येत जातात तसे आतापर्यंतचे लोक थोडे मागे पडतात. पण, मागे पडतात म्हणजे विस्मृतीत जातात असे नाही. मनोरंजनासारख्या क्षेत्रात याचे प्रमाण मोठे आहे. कलाकार व्हायच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर लोक वरचेवर या क्षेत्रात येत असतात. मात्र, तरीही दिग्गज कलाकार काही विस्मृतीत जात नाहीत. त्यांनी आपले स्थान हे आधीच फार भक्कम केलेले असते. असेच एक कलाकार म्हणजे अतुल परचुरे. अत्यंत हरहुन्नरी असलेला हा नट. कोणतीही भूमिका अगदी सहज पेलण्याची क्षमता असलेला, तरीही विनोदात अंमळ जास्त रंगणारा. तर गेले अनेक दिवस, महिने अतुल परचुरे कुठेच दिसत नाही. जणू काही त्याने सगळ्यापासून संन्यास घेतला असावा, अशी शंका यावी. मात्र, तो कुठे होता हे नुकतेच अतुलच्याच एका मुलाखतीतून हे समोर आलं. अतुल परचुरे यांना कॅन्सर झाल्याची बातमी समोर येत आहे. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केलाय.
लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि कॅन्सरचे निदान
कोरोनाच्या काळात म्हणजेच २०२० मध्ये सोनिया आणि अतुल परचुरे यांचा लग्नाचा २५ वा वाढदिवस होता पण त्यावेळी त्यांना तो साजरा करता येत नव्हता. त्यामुळे २०२२ साली त्यांनी ऑस्ट्रेलियाची ट्रिप आयोजित केली. नातेवाईक तिथेच असल्याने न्यूझीलंडला सुद्धा ते फिरणार होते. तब्येत एकदम ठणठणीत असताना तिसऱ्या दिवशी अतुल परचुरे यांना काहीच खावेसे वाटत नव्हते. खायचं म्हटलं की त्यांना जीवावर येई. यानंतर काही दिवसांनी परचुरेंना कावीळ झाली. पुढे डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी सोनोग्राफी केली. डॉक्टरांचे चेहऱ्यावरचे भाव बघता काविळीपेक्षा काहीतरी गंभीर आजार झाला आहे, असं अतुल यांना मनोमन जाणवलं. युट्यूबवरच्या ‘मित्र म्हणे’ पॉडकास्ट या कार्यक्रमात सौमित्र पोटेंनी घेतलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे यांनी या गोष्टीचा खुलासा केला.
डॉक्टरांचे चुकीचे उपचार
लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही गोष्ट त्यांनी सोनिया आणि आईला सांगितली तेव्हा या दोघींनी तुला काहीही होणार नाही अशी प्रतिक्रिया देत, मला सांभाळून घेतल्याचे ते सांगतात. २९ डिसेंबर रोजी पहिली ट्रीटमेंट झाली. मात्र, पहिलेच उपचार चुकले. ट्युमर राहिला बाजूला आणि अतुल परचुरे यांना पॅनक्रीटीस झाला. यामुळे पोट खूप सुजलं, खाल्लं की ढेकर यायचे. अडीच महिन्यानंतरही डॉक्टरांना याच्यावर योग्य उपचार सापडतच नव्हते. यावर विचारणा केली तेव्हा डॉक्टरांना उपचारच माहिती नसल्याचे कारण दिले. तेव्हा अतुलच्या पत्नीने थेट डॉक्टरांनाच याचा जाब विचारला.
तब्येत अधिक खालावली
यानंतर अतुल परचुरे यांची तब्येत अधिकच बिघडली. पायाला भयंकर सूज, झोपही येत नव्हती, बोलता बोलता जीभ सुकायची त्यामुळे नीट बोलताही येत नव्हतं. अतुल आणि कुटुंबीयांनी जोडलेली माणसं यावेळी कामाला आली. सगळे मित्रमंडळी, नातेवाईक मदतीला धावून आले. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे या संकटातून सुखरूप बाहेर पडले.
हा आजार बळावण्यापूर्वी अतुल हे कपिल शर्माच्या शोमध्ये काम करत होते. मात्र, काहीच एपिसोड शूट केल्यानंतर आजारपणामुळे त्यानी या शोमधुन काढता पाय घेतला. वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर आज मी त्याच्याबरोबर अमेरिकेत गेलो असतो असे ते भावूक होऊन म्हणतात. शरीराचं होणारं नुकसान आणि सोबतच आर्थिक नुकसान ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी पचवणं खूप कठीण होतं पण पत्नी, आई तसेच लेकीच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा सावरतोय असं ते सांगतात. ट्युमरवर योग्य उपचार झाले असून ती गाठ आता हळूहळू कमी झाली आहे. येत्या महिन्यात पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे त्यात या आजाराचा धोका टळला आहे किंवा नाही हे समजणार आहे.
कुटुंबाची खंबीर साथ
या मुलाखतीत अतुल म्हणाले, तुमची कशावरतरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, येशूवर, अल्लावर कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी. माझी आई, बायको आणि माझी मुलगी या माझ्या तीन सपोर्ट सिस्टिम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. या संपुर्ण काळात अतुल यांना त्यांच्या कुटुंबाने सपोर्ट केला. अतुल यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिलाय.