विशेष प्रतिनिधी, मुंबई
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले मूक आंदोलन मागे घेतले नसून २१ जून रोजी नाशिक येथे समन्वयकांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. या बैठकीत मराठा समाजाच्या प्रमुख सहा मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या त्यावर काय चर्चा झाली हे सुध्दा त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर आरक्षणामुळे २०१४ ते मे २०२१ पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात. ‘सारथी’ संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. यासह विविध मागण्यांवर झालेल्या चर्चेबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. या सर्व प्रश्नांवर समिती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल कोल्हापूर येथे मूकमोर्चा काढल्यानंतर सरकारने त्यांना आज चर्चेसाठी मुंबईला बोलावले होते. त्यानंतर तब्बल अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकारांना माहिती दिली. तर सरकारतर्फे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, या बैठकीत सकारात्मक निर्णय चर्चा झाले. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.