नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन केले.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स फाडले. यावेळी आंदोलकांनी टायर जाळण्याचाही प्रयत्न केला. तर स्वराज्य संघटनेच्यावतीने राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आली. रविवार ३ सप्टेंबर रोजी मराठा संघटनांनी नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यात शिंदे, फडणवीस सरकार मुर्दाबाद, मराठाव्देषी फडणवीस यांचा निषेध असो, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या नितीन रोटे-पाटील यांनी जालन्याच्या पोलिस अधिक्षकांचे निलंबन करावे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. स्वराज्य संघटनेच्यावतीने परिसरात निदर्शने करण्यात आल्यानंतर समाजातील प्रमुखांनी मनोगत व्यक्त करुन शासनाचा धिक्कार केला. यावेळी जोरदार निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
nashik maratha andolan
Maratha Reservation Nashik Protest Bandh Called