मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज एक अल्टीमेटम दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत तातडीने बैठक घेण्यात यावी, योग्य कालावधी निश्चित करून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मोर्चाने केली आहे.
या संदर्भात मराठा ठोक मोर्चाचे बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली, याबाबत पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून लांबच चालला आहे. आता याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात येईल. त्याचप्रमाणे मराठा समाजाला सध्याच्या ५०टक्क्यांमध्येच आरक्षण देणार आहेत की, याशिवाय वेगळे आरक्षण मिळणार आहे? हे देखील स्पष्ट करावे.
राज्य सरकारने मराठा समाजातील १०६४ मुलांना न्याय देऊन सध्या त्यांचा प्रश्न सोडविला आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. परंतु सदर विद्यार्थ्यांची ज्या विभागात नियुक्ती झाली आहे, त्या विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांना संबंधित पदावर हजर करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याय संदर्भात आम्ही त्यांच्याकडे लेखी तक्रार करीत आहोत, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर याबाबत कारवाई करावी, दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात असला तरी न्यायालयीन लढाईत सरकारची भूमिका काय राहील ? हे देखील आम्हाला स्पष्ट करावे, आम्ही सरकारच्या सोबत आहोत. परंतु याबाबत तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहोत. असेही पाटील यांनी सांगितले.
Maratha Reservation Maratha Kranti Thok Morcha CM