जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढले. पण, या निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे यात सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी जालना येथील अंतरवाली सराटी गावात १० दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी केली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आमची सरसकट प्रमाणपत्राची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या निर्णयाची घोषणा केल्यानंतर आ. राजेश टोपे आणि अर्जुन खोतकर हे मनोज जरांगेंना निर्णयाची माहिती देण्यासाठी पोहोचले. यावेळी दोन पावलं पुढे टाकत आता आंदोलन संपवावे अशी मागणी यावेळी खोतकरांनी केली. त्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात आदेश काढले. पण या आदेशाची प्रत आमच्यापर्यंत आली नाही. काही माध्यमांकडून काही महत्वाचे मुद्दे कळाले आहे. मराठा समाजातल्या ज्या लोकांकडे कुणबी असल्याची नोंद आहेत, त्यांना आजपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पण सर्व सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही सरकारच्या निर्णयावर दहा पावले मागे यायला तयार आहोत. पण सरकारने एक काम केले पाहिजे. आम्ही सूचवलेली दुरुस्ती तेवढी केली पाहिजे. त्यांनी जीआर दुरुस्त करून आणला पाहिजे. तरच संपूर्ण न्याय झाला असे म्हणता येईल असे त्यांनी सांगितले. आमची मागणी फक्त ७० टक्केच मान्य झाली असेही ते म्हणाले..
मुख्यमंत्र्यांनी काल केली ही घोषणा
मराठवाड्यातील मराठ्यांनी निजामकालीन शैक्षणिक आणि महसुली नोंदी दिल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी काल केली. शिवाय कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल असे वाटत असतांना जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
After the government’s decision, Manoj Jarange took this stand regarding the agitation
Maratha Reservation Jalna Manoj Jarange Announcement
Maharashtra Government