नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थितीत होते. या भेटीत राष्ट्रवादीतर्फे खासदार वंदनाताई चव्हाण, भाजपतर्फे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेसनेतर्फे खासदार विनायक राऊत व काँग्रेसतर्फे आमदार संग्राम थोपटे हे सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थितीत होते.
या भेटीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेऊन भेटीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. सकारात्मक चर्चा झाली. यावेळी राष्ट्रपतींनी मी तुमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आहे. मला या विषयाच्या अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या असे सांगितले. गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, ही समाजाची वास्तविकता राष्ट्रपतींपुढे मांडून या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली.
१०५ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून त्यामार्फत मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल तयार करून मराठा समाजास आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने असामान्य परिस्थिती सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच इंद्रा साहनी खटल्यात सांगितले प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदुरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकार मार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता यावेळी राष्ट्रपती यांच्याकडे व्यक्त केली. तसे शक्य होणार नसेल तर साधा व सोपा मार्ग म्हणजे EWS प्रमाणे ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, अशी भूमिका मांडण्यात आली.
यावेळी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी माझ्यासह उपस्थित सर्वपक्षीय प्रतिनिधींचे म्हणणे सविस्तरपणे व गांभीर्यपूर्वक ऐकून घेतले व पुढील कार्यवाही करण्यासाठी या विषयावर अभ्यास करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रपतींच्या या भेटीकरिता महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासह या भेटीसाठी उपस्थित असल्याचेही खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.