मुंबई – मराठा आरक्षणासंबंधी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्राची याचिका फेटाळल्यामुळे आता राज्याची भूमिका संपली आहे. त्यामुळे केंद्राने आता १०२ व्या घटनादुरुस्तीसंबंधी वटहुकूम काढावा आणि घटनादुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्यावेत. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना आरक्षण द्यायचे की नाही ते ठरवावे असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंबधी गायकवाड अहवालात ज्या त्रुटी आहेत त्या भरुन काढून परत तो अहवाल राज्यपालांच्या माध्यमातून राष्टपतींकडे द्यायचा असा एक पर्यांय आहे. हा अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे गेल्यानंतर ते मागास आयोगाला सूचना देऊ शकतील. त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळू शकते असेही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे मुक आंदोलनाबाबत बोलतांना ते म्हणाले की,शासकीय बाबींना वेळ लागतोय म्हणून राज्य सरकारला वेळ दिलाय. त्यामुळे कोरोनाची महामारी असल्याने मराठा आरक्षणासंबंधी सुरु असलेले मुक आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे, ते पूर्णपणे बंद केलेले नाही. आजपासून जनसंवाद यात्रा सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.