नाशिक – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन २१ जून रोजी नाशिक येथे होणार आहे. या आंदोलनासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती नाशिकमध्ये रविवारी सायंकाळी दाखल झाले आहे. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी १० वाजेपासून गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह मैदानावरुन निघणार आहे.
या मूक आंदोलनात जिल्ह्यातील तीन्ही मंत्र्यांसह खासदार, आमदारांना निमंत्रित केले असून आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. सकाळी तीन तास चालणा-या या आंदोलनासाठी काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करावा, हे शक्य नसेल तर किमान काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्य समन्वय करण गायकर व गणेश कदम यांनी केले.
या मोर्चाची नियोजन करण्यासाठी नियोजन शुक्रवारीच नांदुर नाका येथे वरद लक्ष्मी येथे बैठक झाली. त्यानंतर या मूक मोर्चासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. मूक मोर्चाबरोबरच नाशिकमध्ये राज्यभरातील समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.