पुणे – पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची भेट झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी या भेटीत चर्चा केली. या भेटीनंतर दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही राजे एकत्र यावे अशी मराठा समाजाची इच्छा होती. त्यानंतर हे दोन्ही राजे चर्चेसाठी एकत्र आले,आणि त्यांनी आमच्यात एकमत असल्याचे सांगितले.
आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी राज्यभर दौरा केला तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर ही भेट झाली असून त्यामुळे आंदोलनाला बळ मिळाले आहे.
या भेटीनंतर बोलतांना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आजच्या भेटीत आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत आहे. कोल्हापूर आणि साताऱ्याचे घराणे एकत्र आले याचा मला आनंद आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. राज्य सरकारने सहा मागण्या मान्य कराव्यात. अधिवेशनातून अनेक विषय मार्गी लागू शकतात.
या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्ही दोघे एकाच घराण्यातील आहोत. संभाजीराजे यांच्या विचारांशी मी सहमत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणावर राजकारण सुरु आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. जीआर काढून मराठा समाजाला आरक्षण द्या. समाजाचा उद्रेक होईल अशी वेळ येऊ देऊ नका असे ते म्हणाले.