इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून काल रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचाली वाढल्या आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. त्यांनी सोमवारपासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी पुन्हा पत्रकार परिषद घेत त्यांनी कोर्टात अडचण असेल तर आरक्षण देतांना सरसकट शब्द वापरु नका असे म्हटले. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उशीरा बैठक झाली. त्यात तोडगा काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.
य़ाअगोदर उपसमितीची बैठक झाली. त्यातही मागण्यांवर चर्चा झाली. हैदराबाद आणि सातारा गॅझिटियर संदर्भातही काय करता येईल याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन चर्चा केली.
हा होता नवा प्रस्ताव
रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची दोन वेळा बैठक झाली. याबाबत मला कल्पना नाही. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारचा या शब्दाला काही आक्षेप असेल तर त्याला दुसरा पर्याय आहे. सरकारकडे ५८ लाख कुणबी नोंद आहेत. याच आधारावर मराठा आणि कुणबी एक आहे यावर शासन निर्णय काढावा असा नवा पर्याय दिला. तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहे किंवा ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांची पोटजात, उपजात म्हणून आरक्षण द्या, आरक्षण देतांना सरसकट शब्दच वापरु नका, असा नवा सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.