इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून काल रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचाली वाढल्या आहे. काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधांसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. आता पुन्हा ही बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील आपले सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द केले असून ते मुंबईला तातडीने रवाना झाले आहे.
दरम्यान अगोदर बैठकीत मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठा आरक्षण या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, अशी समितीची आणि राज्य सरकारची भूमिका आहे.
या बैठकीस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीसह प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे.