मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मंत्रालयात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दोन विक्षिप्त अधिकाऱ्यांनी तर कमालच केली कामकाजात लक्ष लागत नसल्याने आणि बोअर होत असल्याने टाईमपास म्हणून त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला चक्क गाणे म्हणण्याचा हुकूम सोडला. याप्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. खुद्द संबंधित मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले असून दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, मंत्रालयातील आपल्या सहकारी महिला अधिकाऱ्याकडे ‘मला बरे वाटत नसून बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ अशी लज्जास्पद मागणी करणारा इतर मागास बहुजन कल्याण विभागामधील अवर सचिव आणि उपसचिव या दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात पिडीत महिला म्हणाली की, मी विभागाच्या प्रमुखांच्या (अधिकारी) दालनात गेले असता तेथे उपस्थित विभागाच्या अवर सचिवांनी मला गाणे गायला लावले. ‘बोअर झाले आहे तेव्हा मॅडम तुम्ही गाणे गा’ असे त्यांनी आपल्याला म्हटल्याची लेखी तक्रार या महिला अधिकाऱ्याने मंत्री सावे यांच्याकडे केली.
विशेष म्हणजे मंत्र्यांचे ओएसडीदेखील त्या ठिकाणी होते असे महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. सावे यांनी चौकशीचे आदेश दिले, असे समजते. मंत्रालयात उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत झालेल्या या घटनेचा भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी निषेध केला आहे. संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी या दोन अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित केले असल्याची माहिती वाघ यांनी दिली.
विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेत दोन अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री सावे यांनी दिलेल्या आदेशाचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, याबाबतचे शासकीय परिपत्रक येईपर्यंत आणि कारवाई पूर्ण होईपर्यंत लक्ष असेल, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी आणखी म्हटले की, याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी निलंबित केल्याचा दावा समाज माध्यमांमध्ये केला जात आहे. लेखी आदेश निघत नाही तोवर प्रकरणाचा पाठपुरावा करू.
आणखी महत्त्वाची बाब म्हणजे मंत्रालयात सध्या अनेक प्रकरणी गाजत आहेत, त्यातून वादविवाद आणि गैरप्रकार घडत असल्याचे म्हटले जात आहे. ओबीसी अर्थात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे आणि याच विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांच्यात विविध निर्णयांवरून खडाजंगी झाली आहे. यापुढे कोणतेही निर्णय परस्पर घेतले जाऊ नयेत, असे सावेंनी अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांना सुनावले आहे.
Mantralay Women Officer Sing a Song Officers