मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फडवणुकीची प्रकरणे देशभरातून पुढे येत आहे. आता मात्र कहरच झाला आहे. चक्क पोलिस, मंत्रालयीन कर्माचाऱ्यांसह ३५ जणांची सव्वा कोटीने फसवणूक झाल्याची भानगड समोर आली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
वरळी सी फेस येथील शासकीय निवासस्थानात राहणारे संजय नरसाळे (५१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भांडुपला राहणाऱ्या ललीत विष्णू भालेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, १ जानेवारी २०१७ रोजी कांजूरमार्ग येथील अर्चित एन्टरप्रायझेसचा व्यवस्थापक म्हणून भालेकरची मंत्रालयात ओळख झाली. भालेकरने एक लाख रुपयाला पाच हजार किंवा सहा हजार रुपये दरमहा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, त्यांनी ही गुंतवणूक केली. त्यांनी ४ लाखांची गुंतवणूक केली. त्यांच्यासह मंत्रालयातील आणखीन ३५ जणांनी यामध्ये गुंतवणूक केली.
पूर्वी मिळाला परतावा
सुरुवातीला गुंतवणूकदारांना नियमित परतावा मिळत होता. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यामध्ये जवळपास १ कोटी २८ लाख ३६ रुपयांना गंडविण्यात आले आहे. त्यानंतर, पैसे देणे बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. कोरोनामुळे प्रकरण लांबले. प्रथम कल्याणला तक्रार देण्यात आली. त्यानंतर, डोंबिवली करत हे प्रकरण मरीन ड्राइव्हमध्ये दाखल झाले. या प्रक्रियेत गुन्हा दाखल होण्यास उशीर झाला.
अशी होती ऑफर
१ लाख रुपये गुंतवल्यास दरमहा ५ ते ६ हजारांचा परतावा देण्याची तयारी आरोपीने दर्शविली होती. प्रथम पैसे गुंतविणाऱ्यांना नीट परतावाही मिळाला. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांनाही योजनेची माहिती दिली. त्यांनीही गुंतवणूक केली. अनेकांनी त्यांची आयुष्यभराची जमापूंजी यात गुंतवली आहे.
Mantralay Employee Police Cheating Fir Booked Crime