इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३अ (MUTP-3 & 3A) या प्रकल्पात वातानुकूलित २३८ लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांची खरेदी करण्यासाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाच्या हिश्श्यातून देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातील टप्पा-३ (MUTP-३) व ३अ (MUTP-३A) या प्रकल्पातील २३८ उपनगरीय रेल्वे गाड्यांची खरेदी बाह्य कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून घेण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये राज्य शासनाचा ५० टक्के म्हणजेच २ हजार ४१३ कोटी रुपयांचा हिस्सा राहणार आहे. यासाठी केंद्राच्या रेल्वे बोर्डाच्या मान्यता घेण्यात येणार आहे.
पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी
पुणे शहरात स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या खर्चास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-१ या एकूण ३३.२८ कि.मी च्या दोन मार्गिकांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची महामेट्रोमार्फत अंमलबजावणी सुरू आहे.मार्गिका – १ पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (लांबी १७.५३ कि.मी) (१४ स्थानके) (उत्तर-दक्षिण कॉरीडॉर) तसेच मार्गिका २: वनाज ते रामवाडी (लांबी ५५.७५ कि. मी १६ उन्नत स्थानके) (पश्चिम-पूर्व कॉरीडॉर) या मार्गांवर मेट्रो सेवा सुरु आहे. पुणे मेट्रो मार्ग-३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) या २३.३ कि. मी. उन्नत लांबीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेबर बालाजीनगर व बिबवेवाडी येथे अतिरिक्त स्थानक उभारण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच, कात्रज मेट्रो स्थानक शेजारच्या पीएमपीएमएल बस स्थानकाशी जोडले जावे यासाठी त्याचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करावे लागणार आहे. नवीन दोन मेट्रो स्थानके उभारणीमुळे आणि बोगद्याची लांबी अंदाजे ४२१ मीटर ने वाढविल्यामुळे येणाऱ्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. यात महामेट्रोला पुणे महानगरपालिकेला २२७ कोटी ४२ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. उर्वरित आवश्यक निधीसाठी कर्ज उभारणीस व अनुषांगिक करारांना बैठकीत मान्यता देण्यात आली.