मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जैन समाजाच्या संपूर्ण भारतातील एकूण संख्येपैकी सर्वाधिक म्हणजे ६० लाख इतक्या संख्येने जैन समाज महाराष्ट्रामध्ये राहात असुन, जैन समाजाची देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य ‘महाराष्ट्र राज्य’ आहे. महाराष्ट्रासह देशात सर्वाधिक सामाजिक संस्था चालविण्याची ख्याति असलेला जैन समाज व्यापार-उद्योगामध्येही अग्रेसर असून सर्वाधिक कर देणारा समाज आहे. मात्र याच समाजात शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असून निम्न मध्यमवर्ग व दारीद्रय रेषेखालील लोकांची संख्या ३० टक्के इतकी आहे. समाजातील या घटाकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावे अशी गेली अनेक वर्षांची मागणी होती. त्याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले.
याबाबत प्रतिक्रिया देताना राजेश क्षीरसागर यांनी, हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन धर्मातील महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे व धार्मिक क्षेत्रांचा विकास व संरक्षण, जैन साधु-साध्वी यांची सुरक्षा, जैन धर्म- संस्कृति-साहीत्य यांचे संवर्धन व सुरक्षा, जैन युवकांना उद्यमशीलतेसाठी आर्थिक सहाय्य, जैन विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम या प्रमुख उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन्याची आवश्यकता होती. जैन समाजाच्या सभेमध्ये जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील जैन समाजाच्या उन्नतीचे द्वार खुले झाले असून, निश्चितच याचा लाभ जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे.
जैन समाजाबरोबरच बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी
या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील. यात जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल. या महामंडळाच्या कामासाठी १५ पदे मंजूर करण्यात आली. याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.