नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी सफदरजंग रुग्णालयात अचानक निरीक्षणासाठी सामान्य रुग्ण बनून गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना तेथील सुरक्षारक्षकाने काठी मारल्याचा अनुभव त्यांनी सर्वांना सांगितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गुरुवारी सफदरजंग रुग्णालयात चार सुविधांचा प्रारंभ करताना त्यांनी हा किस्सा सांगितला. देशातील आदर्श रुग्णालय बनिवण्यासाठी त्यांनी व्यवस्थेत सुधारणा करण्याचेही निर्देश दिले.
काठी का मारली
मांडविया यांनी सफदरजंग रुग्णालयात नवा ऑक्सिजन प्लँट, कोरोना उपचारासाठी अस्थायी रुग्णालयासह चार सुविधांचा प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना संबोधित करताना त्यांनी अचानक परीक्षण केल्याचा अनुभव कथन केला. सामान्य रुग्ण बनून आल्यानंतर ते बाकावर बसले तर तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना काठी मारली आणि त्यांना त्या जागेवरून उठविले.
ज्येष्ठ महिलेला मदत मिळाली नाही
मांडविया यांनी पाहिले की रुग्णालयात ७५ वर्षीय महिलेला तिच्या मुलासाठी स्ट्रेचरची गरज होती. गोंधळून गेलेल्या त्या महिलेला सुरक्षारक्षकांनी मदत केली नाही. रुग्णालयांमध्ये रुग्णांना कोणतीच असुविधा होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. रुग्णालयात १५०० सुरक्षारक्षक आहेत. ते ज्येष्ठ महिलेची मदत का करू शकत नाहीत?
सुरक्षारक्षक निलंबित नाही
डॉक्टरांना त्यांनी सांगितले, की या अचानक केलेल्या परीक्षणचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कथन केला. त्यांनी विचारले की ज्या सुरक्षारक्षकाने काठी मारली त्याला निलंबित केले का? उत्तरात आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, की त्यांना व्यवस्था सुधारण्याची इच्छा आहे. २४ ऑगस्टला रात्री मांडविया सामान्य रुग्ण बनून सफदरजंग रुग्णालयात गेले होते. तिथे ते आपत्कालीन विभागात परीक्षणास गेले होते.