नाशिक – एखाद्या सौंदर्य स्पर्धेत आपल्याला विजेतेपद मिळावे, हे तिचे स्वप्न होते. तिने एक नव्हे तर दोन विजेतेपद मिळवणारी नाशिक ची मानसी बिरारी जाधव हिने आंतरराष्ट्रीय सौंदर्य़ स्पर्धेत विजेतेपदाचा मुकूट पटकवला. हॉटेल हयात, पुणे येथे नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठित अशा दिवा पेजंट्स च्या मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०२२ – सीझन ४ सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मानसी मिळाली आणि त्यात सिल्व्हर कॅटॅगरीत मिसेस वेस्ट इंडिया कॅटवॉक २०२२ व मिसेस बेस्ट ड्रेस्ड २०२२ हे किताब जिंकून तिचे स्वप्न साकार झाले. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत निवड झालेल्या ३३ स्पर्धकांपैकी मानसी एक होती.
या विजयामुळे मानसीने दुबईत होणाऱ्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०२२ या स्पर्धेसाठी जोमाने तयारी सुरु केली. दुबईतील २०० नामवंत, प्रेक्षक आणि स्पर्धेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली. निवडक स्पर्धकांतून सर्वोत्तम स्पर्धक निवडण्यासाठी नेमलेल्या परीक्षक मंडळात भारत, दुबई, युक्रेन, मलेशिया व लंडन या ठिकाणच्या नामवंतांचा समावेश होता. दुबईचे हिज एक्सलन्सी सुहैल मोहम्मद अल झरुनी यांच्या उपस्थितीत झालेल्या या फेरीत मानसीचे नाव मिसेस इंडिया इंटरनॅशनल वर्ल्ड २०२२ व मिसेस कॉन्फिडंट २०२२ या किताबांसाठी जाहीर करण्यात आले. दुबईच्या हर एक्सलन्सी मोना अल मन्सूरी यांच्या हस्ते मानसीला विजेतेपदाचा मुकूट परिधान करण्यात आला. मिसेस युरोप नतालिया शिलेप्त्निस्का व इराकचे दुबईतील युनायटेड नेशन्सचे फर्स्ट काऊन्सिल अदील अलजबूरी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही स्पर्धा माइलस्टोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मलिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती.
मानसी बिरारी जाधव म्हणाली, मी महाराष्ट्रातील सटाणा शहराजवळच्या कांधणे गावाची नात आहे. माझ्या कामगिरीने व विजयाने या गावाची मानही उंचावली आहे. माझे वडील देवानंद बिरारी व सासरे अमोल जाधव हे नाशिकमधील राजकीय व सामाजिक जीवनातील नामवंत व्यक्ती आहेत. मी स्पर्धेचा मुकूट जिंकल्याने त्यांना अतिशय आनंद झाला आणि माझ्या वडिलांनाही आपण पृथ्वीतलावरील सर्वांत आनंदी व्यक्ती असल्याच्या भावनेने मन भरुन आले. मानसी जे काम करते ते उत्कट आकांक्षेने करते. तिने मेकॅनिकल अँड एव्हिएशन मॅनेजमेंटचा डिप्लोमा चा कोर्स पूर्ण केला आणि नंतर अभियांत्रिकी शिक्षण तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन (एचआर) क्षेत्रातील एमबीए पदवी पूर्ण केली. सध्या ती याच क्षेत्रात पीएचडी करत आहे. मानसी ही धाडसी महिला असुन तिची निवड फॉर्म्युला ४ कार रेसिंगसाठी झाली होती. त्यांचा नाशिकमध्ये ऑक्सिजन प्रकल्पही असल्यामुळे ते जिल्ह्यातील रुग्णालये व उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात.
मानसी या यशावर थांबणार नाही. लवकरच तुर्कस्तानमध्ये होणाऱ्या मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल वर्ल्ड पेजंट या सौंदर्य स्पर्धेला जाण्यासाठी मी सज्ज आहे. असे तिने आत्मविश्वासाने बोलून दाखवले.