मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर या निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर परप्रांतियांबाबतच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न त्यातून केल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसापासून मनसे व भाजप यांच्या युतीच्या चर्चेला उधाण आले होते. त्यात नाशिक येथे हे दोन्ही नेते आपल्या स्वतंत्र्य दौ-या निमित्त एकाच वेळी आले. त्यावेळेस त्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट झाली होती. त्यावेळी या भेटीची माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली होती. आताही त्यांनी पुन्हा या भेटीची माहिती पत्रकारांना दिली. नाशिकमध्ये झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे ही भेट घेतली. मी अहंकार मानणारा नेता नाही असे सांगत त्यांनी कुणी घरी ये म्हटल्यानंतर घरी जाणे ही परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. ही भेट राजकीय नव्हती. असेही ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते असे सांगून त्यांनी हातचे राखतच बोलणे पसंत केले.
नाशिकमध्ये झाली होती भेट
नाशिक येथे या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. त्यावेळेस त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती. यावेळी माझ्या परप्रांतीयांच्या विषयाचा विपर्यास झाला, असे राज ठाकरे यांनी पाटील यांना सांगितले होते. त्याची लिंकही ते पाठवणार असल्याचे त्यावेळी ठरले. पण, त्या लिंकबाबत नंतर वेगवेगळे वृत्त आले. नाशिकला पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची माहिती पत्रकारांनाही दिली. ते त्यावेळेस म्हणाले की, राज ठाकरेंसोबत फक्त हवापाण्याच्या गप्पा नाही मारल्या. त्यांच्यासोबत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. राज आणि माझी जुनी मैत्री, आज सदिच्छा भेट झाली. पण, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मनसेसोबत युती करण्याबाबत पक्षात मंथन करावं लागेल. आम्ही अन्य छोट्या संघटनांना मंत्रीपद देऊ शकतो, तर राज ठाकरे हे तर मोठे नेते असे सांगितले होते. पण, आता ही भेट होणार असल्यामुळे त्यात निश्चितच राजकीय चर्चा होणार आहे. भाजपने मनसेबरोबर युती केली तर त्याची मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या भेटीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.