नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नऊ दिवसापूर्वी नााशिक येथे शासकीय विश्रामगृहावर भेट झाली होती. या भेटीत राज ठाकरे यांनी माझ्या परप्रांतीयांच्या विषयाचा विपर्यास झाला, असे सांगत त्याची लिंक पाठवतो असे पाटील यांना सांगितले होते. आता ही लिंक आज राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा मनसे व भाजपच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबरोबर युतीबाबत अद्याप कोणतीची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिकची ही भेट १८ जुलै रोजी ही भेट झाली होती. त्यात राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांनी पंधरा मिनीटे चर्चा केली होती. या भेटीची माहिती नंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंसोबत फक्त हवापाण्याच्या गप्पा नाही मारल्या. त्यांच्यासोबत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. माझ्या परप्रांतीयांच्या विषयाचा विपर्यास झाला, असे राज ठाकरे यांनी सांगितले, त्याची लिंकही ते पाठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. मनसेसोबत युती करण्याबाबत पक्षात मंथन करावं लागेल. आम्ही अन्य छोट्या संघटनांना मंत्रीपद देऊ शकतो, तर राज ठाकरे हे तर मोठे नेते असल्याचेही त्यावेळी ते म्हणाले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु आहेत. तसे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत. त्यातच हे दोन्ही नेते नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर या दोन्ही नेत्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहावरच होता. त्यामुळे या युतीची चर्चा अधिकच रंगली होती,
भेटीअगोदर पाटील यांनी हे सांगितले होते
पण, या भेटी अगोदर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते की, नाशिकमध्ये भाजप – मनसे युती होईल की नाही हे सांगणे माझा अधिकार नाही. आमची कोअर कमिटी असते या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत चर्चा विनिमय केल्यानंतर कोणता निर्णय़ घेतला जातो. पंरतु असे काही ठरले नाही. परस्पर काही करण्यासाठी मी प्रसिद्ध नाही असे सांगितले होते. पण, त्यानंतर या दोन्ही नेत्यांची भेट झाली व वेळाही जुळल्या. पण, आता या लिंक पाठवल्यानंतर मनसे व भाजपची लिंक जुळते की नाही हे आता औत्सुक्याचे आहे.