नाशिक : वाढत्या महागाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यास आलेल्या उपभोक्त्यांना पेट्रोल ७० रु. डिझेल ६० रु. तर गॅस सिलिंडर ४५० रु. झाल्याचे बॅनर लावत साखर वाटून पेट्रोल दरवाढ मागे घेण्याबाबत अभिनव एप्रिल फुल आंदोलन केले.
केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये वेळोवेळी विविध करांच्या माध्यमातून केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळून निघाली आहे. केंद्र शासनाने पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलवरील करांत केलेली कपात फसवी ठरली तर महाराष्ट्र शासनाने करांमध्ये कुठलीही सूट जाहीर केलेली नसून राज्यातील जनता महागाईच्या दुष्ट चक्रात भरडली जात आहे. रशिया व युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीचे कारण देत तेल कंपन्यांनी मागील आठवड्यात तब्बल पाच वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या दरात ५० रु. वाढ झाल्याने एक हजाराच्या पलीकडे गेलेल्या गॅस सिलिंडरवर फक्त ४०.१० रुपयेच सबसिडी मिळत आहे. दोनशे रुपयांच्या घरात गेलेल्या गोडे तेलामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्या पाठोपाठ वाहतूक दर वाढून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून वाढत्या महागाईमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. दारू वरील अबकारी करात सूट देणारे सरकार पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत मात्र दुजाभाव करून गोरगरीब जनतेच्या जीवीताशी खेळत आहे. इंधनाच्या दरात कपात होऊन दिलासा मिळण्यासाठी शासनाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्य जनतेस वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्राहकांना साखर वाटून पेट्रोल दरवाढ मागे घेण्याबाबत अभिनव एप्रिल फुल आंदोलन केले.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष नितीन माळी, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, शहर सरचिटणीस निखील सरपोतदार, मिलिंद कांबळे, शहर संघटक संजय देवरे, अमित गांगुर्डे, किरण क्षिरसागर, नवनाथ जाधव, अर्जुन वेताळ, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल (बब्बू) पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते