नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या गत पंचवार्षिक सत्ताकाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांची अत्यंत दुरावस्था झालेली असून आत्ताच्या सत्ताधाऱ्यांकडून या प्रकल्पांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर या सर्व प्रकल्पांना भेट दिली. त्यानंतर येथील दुराव्यवस्था बघितल्यावर मनसेतर्फे आयुक्तांना या प्रकल्पांच्या देखरेखी बाबत निवेदन दिले.
या निवेदनात आता ‘बस झाली दुरावस्था… आत्ता तरी करा नीट व्यवस्था’ अशी आर्त हाक दिली आहे. यात आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे अशी आग्रही मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. शहर विकासाच्या प्रचंड आवडीतून राज ठाकरे यांनी महानगरपालिकेवर कुठलाही बोजा न पडू देता विविध कंपनी सीएसआर निधीतून नाशिकच्या सौंदर्यात वाढ होईल असे अनेक पथदर्शी प्रकल्प जातीने लक्ष घालून उभे केले. गोदापार्क, चिल्ड्रेन ट्राफिक पार्क, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलाजवळील १०० फुटी कारंजे, लेझर लायटिंगयुक्त वॉटर कर्टन, देशातील सर्वात मोठे बॉटनीकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक (ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय), उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण, विविध वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, खड्डे मुक्त रस्ते असे अनेक प्रकल्प फक्त पाच वर्षांत उभे केले.
मात्र राज ठाकरे यांच्या शहर विकासाच्या या प्रत्यक्ष कृतीस सोडून जनतेने आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा हाती सत्ता दिली. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी मनसेच्या काळात उभे राहीलेल्या या प्रकल्पांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे आज यातील बहुतांश प्रकल्पांची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. राज ठाकरे यांनी नाशिककरांच्या करातील एकही पैसा न वापरता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या CSR निधीतून पांडवलेण्याच्या पायथ्याशी साकारलेल्या पं. जवाहरलाल नेहरू बॉटनीकल गार्डनमधील बोलकी झाडे, फुलपाखरू प्रवेशद्वार, लहान मुलांसाठीची खेळणी अश्या अनेकविध वैशीष्ट्यांमुळे नाशिककरांच्या पसंतीस उतरलेल्या या बॉटनीकल गार्डनची सध्या प्रचंड दूरावस्था झालेली असून अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे लेझर लायटिंगयुक्त बोलकी झाडे शो बंद पडला. तुटलेली खेळणी, कॉलेज तरुण-तरुणींचे चाललेले अश्लील चाळे, मोकळ्या जागेत समाज कंटकांकडून मादक पदार्थांचे सेवन करून मुली व महिलांची छेडछाड अशा घटनांमुळे परिसर बदनाम होऊन कुटुंबवत्सल नाशिककर येथे भेट देणे टाळत आहेत. या बॉटनीकल गार्डनची डागडुजी करून येथे कायम स्वरूपी पोलिसांची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच गोदापार्क, १०० फुटी कारंजे, वॉटर कर्टन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय आदि प्रकल्पांची तातडीने डागडुजी होणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून कंपनी सीएसआर निधीतून साकारलेल्या विविध पथदर्शी प्रकल्पांच्या देखरेखीसाठी मनपा आयुक्तांनी महानगरपालिका यंत्रणेस योग्य ते निर्देश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक व संदीप देशपांडे, मनसे रस्ते आस्थापना अध्यक्ष, योगेश परुळेकर, मनसे चित्रपट सेना, अध्यक्ष, अमेय खोपकर, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, गट नेत्या, नगरसेविका नंदिनीताई बोडके, ज्येष्ठ नगरसेवक सलीम (मामा) शेख, नगरसेवक योगेश शेवरे, नगरसेविका वैशालीताई भोसले यांच्या सह्या आहेत. या वेळी आयुक्त कैलास जाधव यांनी या बाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.