नाशिक – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या नाशिक दौ-यावर आहे. गेले दोन दिवस ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी घेत आहे. आज दुस-या दिवशी अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांचे मनसैनिकांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्यावर नाशिक महापालिका निवडणुकीची सूत्रे दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
अमित ठाकरे नाशिक दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वांचं प्रेम पाहून भारावून गेलोय, साहेब जी जबाबदारी देतील ती घ्यायला तयार आहे. मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाबाबत अजून पर्यंत निर्णय नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विद्यार्थी सेनेचे आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांना विचारले असता देशपांडे यांनी मनसे फक्त राज ठाकरेंच्या नावावर आणि जीवावर चालते, कुणाच्याही येण्या-जाण्याने काहीही फरक पडत नाही, जे गेले त्यांना शुभेच्छा. मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंवर प्रेम करतात. मनविसे अध्यक्ष पदाबाबत राज ठाकरेचं निर्णय घेतील. कार्यकर्त्यांच्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहचल्या आहेत यावेळी त्यांनी भाजप सोबत युतीचा निर्णयबाबत सांगितले की, हा निर्णय़ राज ठाकरेच घेतील.
मनसेने कंबर कसली
नाशिक महानगरपालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांचा हा दौरा असून या निवडणुकीत मनसेने कंबर कसली आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मनसेने व्यूहरचना आखली आहे. मनसेने २००७ मध्ये १२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये ४० जागा जिंकून महानगरपालिकेची सत्ता मिळवली होती. पण, २०१७ मध्ये मनसेची घसरगुंडी झाली,. या निवडणुकीत केवळ मनसेला पाच जागा मिळाल्या. त्यामुळे या निवडणुकीत मनसेने पुन्हा गतवैभव मिळवण्यासाठी राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.