मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मनसेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे, सुनील जाधव यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही हकालपट्टी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर हे भाजपमध्ये किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. या हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मी भाजपच्या काही लोकांना भेटलो म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरुन माझ्यावर कारवाई करण्यात आली, पण, मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी निलेश राणे यांना भेटलो होता. पण, माझ्यबद्दल संशय निर्माण झाल्याने कारवाई झाली असे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे व ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्ष सोडत आहे. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वीच त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे.
