इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. त्यांच्यात ५० मिनीटांहून अधिक चर्चा झाली. या भेटीमागील कारण स्पष्ट झाले नाही. पण, बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर दुस-याच दिवशी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नागरिकांचे विविध प्रश्नांसाठी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. पण, ही भेट राजकीय असून त्यात नेमकी काय चर्चा झाली हे कोणीही अद्याप अधिकृतपणे सांगितले नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती. त्यानंतर हे दोघे भाऊ एकत्र आले. त्यानंतर पतसंस्थेच्या निवडणुकीत एकत्र पॅनलही उभे केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही.
पण, दरम्यानच्या काळात महायुतीच्या नेत्यांनी या ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेवर चांगलीच टीका केली. पण, यात उध्दव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले. तर राज ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले. महानगरपालिका निवडणुकीत अजूनही मनसे – ठाकरे गटांची युती असेल का हे अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. ठाकरे गटाने एकतर्फी घोषणा केली असली तरी राज ठाकरे यांनी अधिकृतपणे त्यावर शिक्कामोर्तब केलेला नाही. त्यामुळे भविष्यात काही वेगळया राजकीय घटनाही होऊ शकतात. त्यामुळे या भेटीकडे बघितले जात आहे.
राज ठाकरे यांनीच सांगितले भेटीमागील कारण
गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी भेट घेतली. त्यांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलिस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनाधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सराकराने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो – पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे असे राज ठाकरे यांनी सांगितले.