इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी खासदारांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर तोंडावर जाब विचारत चांगलाच दणका दिला.
लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच त्यांना घेरलं. मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाहीय, असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं.
या घटनेनंतर मनसेने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यात महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का आहेत? मराठी माणसाचा अपमान या ४५ खासदारांना सहन कसा होऊ शकतो? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का? असा प्रश्न केला आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की,’मराठी माणसांना आपटून आपटून मारेन… ” अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदार वर्षाताई गायकवाड, प्रतिभाताई धानोरकर, शोभाताई बच्छाव यांनी आज संसदेत घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या बेताल विधानाचा जाब विचारला. यासाठी तिन्ही खासदार महोदयांचे मनापासून अभिनंदन. पण महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का आहेत? मराठी माणसाचा अपमान या ४५ खासदारांना सहन कसा होऊ शकतो? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे.