इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पालघर येथील मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्यासह त्यांच्या भावावर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाला आहे. पंधरा ते वीस मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गावगुंडानी धारधार शस्त्राने हा हल्ला केला. हा हल्ला ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांकडून केला आहे. दरम्यान ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
मोरे यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करत त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यानंतर मोरे यांना जखमी अवस्थेत शगुन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर येथे उपचार सुरु आहे. बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
गेल्या काही दिवसांपासून पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अंतर्गत वाद सुरु आहे. या वादाचे रुपातंर थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत गेले आहे. रविवारी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन पराभवाची कारणे सांगितली. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नाही. अशी तक्रार केली. त्यानंतर राज ठाकरे यानी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली. त्याचा राग मनात धरुन अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचे मोरे यांच्या सहका-यांकडून सांगण्यात येत आहे.