इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रत्नागिरीः सध्या राज्यातील राज्यकर्ते आणि राजकारणी कसेही वागत आहेत. मतदारदेखील त्यांच्याकडे शांतपणे बघत आहेत. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यात बदल करत नाही, त्यांना घरी बसवत नाही, तोपर्यंत विकास होत नाही. मागील पाच वर्षात या सर्व लोकांनी राजकारणात गोंधळ घातला. काही या पक्षातून त्या पक्षात गेले. काही पक्ष सोबत घेऊनच दुसरीकडे गेले. आम्ही हे सर्व बरोबर केले असल्याचा त्यांचा समज जनता जोपर्यंत चिडून, भडकवून दूर करत नाही, तोपर्यंत विकासाची स्वप्ने विसरून जा, असा सल्ला महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. महायुतीवर टीका करताना जनतेलाही त्यांनी सुनावले.
मतदारांनी निवडून दिलेल्या नेत्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांना विचारला जात नसल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, की केवळ पर्यटनावर कोकणातील सिंधुदुर्गसह तीन जिल्हे हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात. केवळ पर्यटन या विषयावर गोवा राज्य चालवले जात आहे. कोकणामध्ये कोणते उद्योग धंदे आणले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता उद्योगधंदे आणू अशी ग्वाही विद्यमान आमदार, खासदार देतात. मग इतके वर्ष त्यांनी काय केले? असा प्रश्न त्यांना का विचारला जात नाही, असेदेखील राज म्हणाले आहे. कोकण इतका सुंदर करता येऊ शकतो, ते आतापर्यंत का झाले नाही? याचे कारण मतदारांनी त्याच त्याच लोकांना आणि त्याचत्याच पक्षांना निवडून दिले असल्याचे ते म्हणाले.
इथून आमदारांना आणि खासदार निवडून दिले, की ते दिल्लीत जाऊन काय करतात? कोणते प्रश्न मांडतात? कोकणातील आतापर्यंत कोणते प्रश्न त्यांनी दिल्लीत मांडले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पर्यटन विषयी कोणते प्रश्न मांडले गेले? असा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असेही ते म्हणाले. मागील सतरा अठरा वर्षापासून कोकणच्या रस्त्याचे कामे सुरू आहेत; मात्र अद्यापदेखील आम्ही खड्ड्यातून जात असल्याचे राज यांनी म्हटले आहे.