इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची बातमी नुकतीच वृत्तवाहिन्यांवर पाहिली. एन्काऊंटर कसा झाला, कोणी केला, यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता, पहिला विचार जो आला, तो एकच – त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच अशी प्रतिक्रिया मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.
त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी, नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतील. एन्काऊंटरच्या निमित्ताने सरकारला कोंडीत पकडण्याचेही प्रयत्न होतील. अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करूच शकत नाही, पोलिसांनीच कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला, असे अनेक तर्कवितर्क लढवले जातील. परंतु, जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो, त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकतं?
असो, मला त्या विषयाच्या खोलात जायचे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आणि त्या पक्षामध्ये काम करणाऱ्यांची वेगवेगळी राजकीय विचारधारा असू शकते.
मुळात मला आपल्या सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे वेधायचे आहे की, महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या. परंतु, अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात मग सरकार कोणाचेही असो, महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे.
बदलापूर प्रकरणातसुद्धा अजूनपर्यंत संस्थाचालक फरार आहेत, त्यांना अटक होऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही का झाली नाही, याचे उत्तर गृहमंत्री आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिलेच पाहिजे. ‘शक्ती कायदा’, जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे, त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही पक्षातर्फे करतच आहोत. परंतु, इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही, याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?
.