मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या औरंगाबाद येथील जाहीर सभेमुळे मननेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन मोठी गर्दी केली आहे. थोड्याच वेळात ही सभा सुरु होणार आहे. सर्वत्र भगवेमय वातावरण आहे. या सभेकडे सर्वाचे लक्ष लागले असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सायंकाळी सहा वाजताच अर्धेहून अधिक मैदान भरले होते. राज्यभरातून या सभेला कार्यकर्ते जमा झाले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील ध्वनिक्षेपक काढण्यासाठी दिलेला अंतिम इशारा आणि त्यावरून तापलेल्या राजकारणामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज यांची सभा औरंगाबादमधील मराठवाडा सास्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. तीन दशकांपूर्वी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या मैदानावर सभा घेतली होती. त्यानंतर औरंगाबाद येथील सभेमुळे मुंबईच्या बाहेर हिंदुत्वाचे राजकारण करण्यास बाळासाहेबांना मदत मिळाली होती. आता ३४ वर्षांनंतर मनसेनेसुद्धा याच शहराची आणि याच मैदानाची निवड केल्यामुळे मनसेला याचा कितपत फायदा होतो हे येणा-या काळात कळणार आहे.