नाशिक – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने संपूर्ण देशभरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आले. तशाच प्रकारे मशिदीवरील भोंगे हटविण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सरकारचे काम आहे, शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तो धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमाज पठण किंवा मशिदीला विरोध न करता केवळ त्यावरील भोंग्याना विरोध दर्शवला आहे. मुस्लिम बांधवांनी स्वतःहून मशिदीवरील भोंगे काढल्यास एक चांगला संदेश समाजात जाऊ शकतो असे प्रतिपादन मनसेचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक सलीम शेख यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन त्यांना काही जामनेरच्या जावेद मुल्ला यांनी फोन करुन विचारणा केली आहे. सध्या या संभाषणाची ऑडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सलीम शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबईतील शिवतिर्थावर गुडी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मशिदींवरील भोंग्यावर भाष्य केले. मशिदींवरील भोंगे काढून टाकले गेले नाहीत, तर आम्हीही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेविरोधात मनसेच्या बहुतांश मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असताना, नाशिकमधील मनसेचे ज्येष्ठ नेते तथा माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी मात्र कायद्याची बाजू पकडली आहे. राज ठाकरे यांनी नमाजपठण, आजान किंवा मशिदीला विरोध दर्शवला नसल्याचे ते म्हणाले. राज ठाकरेंनी कायद्यावर बोट ठेवला असून शासन आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, संविधानाने प्रत्येकाला हक्क दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात मुस्लिम बांधवांनी न्यायालयात दाद मागावी. राज ठाकरेंच्या वक्तव्याचा काही विरोधक विपर्यास करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
जातीय रंग देऊ नये
जातीय रंग देऊ नका प्रत्येक नागरिकासाठी सर्वप्रथम देश, त्या देशाचे संविधान आणि तेथील कायदा महत्त्वाचा आहे. प्रत्येक जाती धर्माच्या नागरीकासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे या विषयाला जातीय रंग देऊ नये.
– सलीम शेख, माजी स्थायी समिती सभापती, नाशिक मनपा