नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण विधी विभागाचे जिल्हा उपसंघटक अॅड. सागर कडभाने यांना मारहाण करणाऱ्या एका राजकीय पक्षाचे गुंड प्रवुत्तीचे पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पोलीस उपायुक्त यांची भेट घेत निवेदन दिले. या वेळी पोलीस उपायुक्त साहेबांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मनसेचे पदाधिकारी अॅड. सागर कडभाने हे बुधवार दिनांक १६ मार्च २०२२ रोजी कामा निमित्ताने उपनिबंधकांच्या कार्यालयात गेले असतांना एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी निलेश साळुंखे व त्यांचे बंधु शैलेश साळुंखे यांनी निष्कारण वाद करून शिवीगाळ केली. तसेच त्याच दिवशी सायंकाळी निलेश साळुंखे, शैलेश साळुंखे व पाच इसमांनी अंबड पोलीस ठाण्या समोरच असलेल्या अॅड. सागर कडभाने यांच्या संपर्क कार्यालयात बळजबरीने प्रवेश करत अॅड. सागर कडभाने यांना जबरी मारहाण केली व गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन व जवळपास ५५०० रुपये रोख घेऊन फरार झाले. पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच झालेला हा अमानुष मारहाण व लुटीचा प्रकार अत्यंत भयावह असून कायद्याचे पालन करणाऱ्या एका वकिलावरच झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे परिसरातील सामान्य नागरिक व व्यावसायिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकाराची चौकशी करून तात्काळ गुन्हेगारांवर कडक कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा असी मागणी मनसेने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ मनसे नगरसेवक सलिम (मामा) शेख, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, मनसे विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल तिडके, शहर संघटक अॅड. महेंद्र डहाळे आदि पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मा. पोलीस उपायुक्त साहेबांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.