नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता बनायला हवेत आणि त्याही पुढे जाऊन शेतकरी इंधनदाता बनायला हवा. आज संपूर्ण विदर्भात जेवढे पेट्रोलमध्ये इथेनॉल असते, ते आम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने तयार करतो. अन्नदाता, ऊर्जादाता शेतकरी आता बिटूमेनदाता देखील झाले आहेत. त्यादृष्टीने आजचा बायो-बिटूमेन निर्मित महामार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देशातील शेतकऱ्यांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केले.
भारतातील पहिल्या बायो-बिटूमेन निर्मित (लिग्निन टेक्नॉलॉजी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या स्ट्रेचचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते मनसर (ता. रामटेक) येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अतुल मुळे, प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, प्राजचे प्रिन्सिपाल सायंटिस्ट डॉ. सिध्दार्थ पाल, सीएसआयआर- सीआरआरआयच्या प्रिन्सिपाल सायंटिस्ट डॉ. अंबिका बेहल, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव कमलेश चतुर्वेदी आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी हायड्रोजन तयार करावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कारण गहू, धान, मका, ऊस लावूनही जेवढे उत्पादन मिळत नाही, त्यापेक्षा अधिक उत्पन्न मक्याच्या उत्पादनातून मिळत आहे. मक्यापासून इथेनॉल बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा मक्याचा भाव १२०० रुपये क्विंटल होता आणि जेव्हा मक्यापासून इथेनॉल बनणे प्रत्यक्षात सुरु झाले तेव्हा मक्याचा भाव २४०० रुपये क्विंटल झाला. मक्याचे क्षेत्र दुप्पट होते आहे. एका वर्षात मक्याची तीन पिके काढली गेली तर स्वाभाविकरीत्या एक ते दीड लाख रुपये प्रति एकर उत्पन्न मिळू शकते.’
धानाची शेती करणाऱ्यांना फायदा
रामटेक, मनसर या भागात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होते. धान काढल्यानंतर जमिनीत उरणारे तणस, परळी (rice straw) जाळण्याऐवजी त्यापासून अन्य पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान देशात तयार केले आहे. आमच्या तुमसर देव्हाडाच्या साखर कारखान्यात सीएनजी उत्पादन सुरु होत आहे. आता शेतकरी इंधनदाता बनत आहेत. या कार्यक्रमापूर्वी इथे एका सीएनजी पम्पचे उदघाटन केले. तीन महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये बजाज कंपनीची सीएनजीवरील दुचाकी लॉन्च केली. पेट्रोलवरून सीएनजी वर गेल्यास वाहन इंधनाचा 50 ते 60 टक्के मासिक खर्च कमी होईल, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कमी खर्चात मजबूत रस्ता
बांबूवर आधारित प्रकल्प उभारून त्यापासून CNG सीएनजी तयार केले, तर रामटेक मनसर तालुक्यातील वाहने भविष्यात सीएनजीवर चालतील, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. धान, मका आणि उसापासून निघणारा कोळसा बारीक करून बिटूमेनमध्ये टाकण्यात आला. ज्या रस्त्याचे उद्घाटन आज केले त्यामध्ये हेच मटेरियल वापरण्यात आले आहे. त्यापासून बनवलेला रस्ता हा नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा 40 टक्के अधिक मजबूत आहे. देशाला आज 40 लाख टन डांबर लागतो. त्यातील 45 हजार टन डांबर रिफायनरीमधून येतो. बाहेरून येणाऱ्या 45 हजार टनसाठी आम्ही 25 हजार कोटी रुपये खर्च करतो. त्या ऐवजी 400 कंपन्या तणसापासून सीएनजी बनवतात. त्यामुळे रस्ते निर्मितीची किंमत कमी होऊन मोठा फायदा होईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.