नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. याकरिता मनपाने शहरातील सर्व सहा विभागात एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांचे घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांवर त्यांच्या मूर्ती दान द्याव्यात तसेच निर्माल्यदेखील संकलन केंद्रांवर जमा करण्यात यावे. नागरिकांना दीड, तीन, पाच, सात दिवसाच्या मुर्तींचे विसर्जनाकरिता नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रीम विसर्जन स्थळे हे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जना करीताच उपलब्ध असतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.