नाशिक – आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक संभाव्य वेळेत होणार असल्याने राष्ट्रवादीने जोमाने तयारी सुरु केली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीला सहा महिने कालावधी शिल्लक राहिल्याने राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. याकरिता शहरातील ३१ प्रभागातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ.अपूर्व हिरे, निवृत्ती अरिंगळे, गटनेते गजानन शेलार, मधुकर मौले, संजय खैरनार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, मनोहर बोराडे, अनिता भामरे, अंबादास खैरे, अॅड.गौरव गोवर्धने, दत्ताकाका पाटील, बाळासाहेब जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, सुरेखा निमसे, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, शंकर मोकळ, कुणाल बोरसे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार जयवंत जाधव आपल्या भाषणात म्हणाले की, नाशिक महापालिका निवडणूक फ्रेबुवारी महिन्यात होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तयारी सुरु केली आहे. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ रचनेवर जास्तीत जास्त भर द्यावा, निवडणुकीकरिता कालावधी कमी राहिला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत बिनबुडाचे आरोप करण्यात आले होते. परंतु संविधानाचा विजय झाला असून सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राज्यासह नाशिक शहरातील राजकीय परिस्थिती वेगळी बनली आहे. जनसामान्यांमध्ये पक्षाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस महाविकासआघाडीचे सरकार राज्यात असून नाशिक महापालिका निवडणूकीत महाविकासआघाडी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु कालावधी कमी राहिल्याने तयारीचा वेग वाढवावा लागणार असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांनी तळातील काम वाढविणे गरजचे आहे. इच्छुकांनी रिव्हर्स कॅलेंडर बनवून मतदार याद्यांचे वाचन सुरु केले पाहिजे. दुबार नावे वगळून नवीन मतदार नोंदणी केली पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी वार्ड रचना, मतदार यादीचे अपडेशन या सर्व प्रक्रिया इच्छुकांनी राबविल्या पाहिजे. उमेदवारी कोणाला मिळेल याची आज शाश्वती देता येत नाही परंतु इच्छुकांनी स्वतःचे स्थान निर्माण केले पाहिजे जेणेकरून पक्ष स्वतःहून उमेदवारी देईल अशा सूचना यावेळी त्यांनी इच्छुकांना दिल्या.
इच्छुक उमेदवारांची चाचपणी
नाशिक शहरातील सहा विभागात दौरा करून प्रभाग व वार्डनिहाय इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली आहे. आतापर्यंत १२२ जागेकरिता ५२८ उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली असून यासह अन्य इच्छुकांना माहिती नसल्याने त्यांनी फोनद्वारे संपर्क साधला आहे. त्यांचीही चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.