नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तपोवनात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याबाबतचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात त्यासाठी दहा हेक्टर जागा उपलब्ध करून दिली जाईल. नंतर टप्प्याटप्प्याने या केंद्राचा विस्तार करण्यात येईल,अशी ग्वाही महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी निमा व आयामा पदाधिकारी यांच्या बैठकीदरम्यान दिली.
हा आराखडा तयार करताना पार्किंग, वीज , पाणी, अग्निशामक सुविधा सह नाविन्यपूर्ण जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुखसुविधांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नाशिक औद्योगिक श्रेत्रात सर्व रस्ते टप्या टप्याने कोंक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात अंबड एमआयडीसी मधील एक प्रमुख रस्ता एप्रिल मधे सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन – निमा चे अध्यक्ष आशिष नहार व आयाम चे अध्यक्ष ललित बूब यांच्या नेतृत्वाखाली विविध औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्या बोलत होत्या.
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेला मालमत्ताकर कमी करून वाजवी दराने त्याची आकारणी करण्यात यावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली असता उद्योजकांना कमर्शियल दरानेजी आकारणी लागू होती ती आता औद्योगिक दराने करण्याचा निर्णय झाल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणले.
औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, पथदीप,स्वछतागृह,वाहतूक, अन अधिकृत थांबे,रस्ते,पथदीप, घंटागाडी, स्वछतागृह आदी प्रश्न चर्चेस आले असता ते सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे अभिवचन आयुक्तांनी दिले.एलबीटीच्या जुन्या मुद्द्यावरही यावेळी सर्वंकष चर्चा झाली. एलबीटीचा परतावा उद्योजकांना लवकरच मिळणार असेही त्यांनी स्पष्ट केले.सांडपाणी व्यवस्थापन केंद्र व सामायिक पाणी प्रक्रिया केंद्र उभारणीचा मुद्दा चर्चेस आला असता लवकरच या कामास सुरुवात करणार आणि मुख्यमंत्र्यांकडे आपण जातीने या प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
अंबड औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशन नाशिक महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही लवकर व्हावी अशी मागणी उद्योजकांनी केली असता एमआयडीसीबरोबर बैठक लावून लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींच्या सर्वांगीण विकासासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करावी हा प्रश्न चर्चेस आला असता पुढील आर्थिक वर्षापासून त्यासाठी ठराविक तरतूद करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अस्तित्वात असलेला रिंग रोड पूर्णत्वास नेण्यात येईल असेही बैठकीत सांगण्यात आले.
चर्चेत निमा उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सतीश कोठारी, आयमा उपाध्यक्ष उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ,सचिन कंकरेज, हेमंत खोंड, कुंदन दरांगे, रवींद्र धारणकर, एम.व्ही.गीते, अनिल गायकवाड, गणेश मैद, जितेंद्र पाटोळे, शहर अभियंता संजय अग्रवाल, उपयुक्त प्रदीप चौधरी, महापालिका उपायुक्त अजित निकत आदींनी भाग घेतला.