नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या टिमवर्कमुळे एका महिलेचे प्राण वाचले. जिल्हयातील लखमापूरच्या एका ३६ वर्षीय महिलेला पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात २७ ऑक्टोबरला गर्भपात करून संततीनियमनाच्या ऑपरेशनसाठी महिला दाखल झाली होती. या ऑपरेशन दरम्यान रुग्णास अतिरक्तस्राव होत असल्याने ते थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. त्यानंतर रक्तस्त्राव थांबवून तातडीने गर्भ पिशवी काढण्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे महिलेचे प्राण वाचले. या सर्व कामात टीम वर्क बघायला मिळाले.
रक्तस्त्राव होत असल्यामुळे इंदिरा गांधी रुग्णालयात ऑपरेशन करणाऱ्या डॉ. सोनाली जोखडे यांनी त्वरीत इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील स्त्री रोग तज्ञ डॉ. रीना काळदाते यांना बोलावून घेतले. दोन्ही डॉक्टरांनी मिळून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु यश येत नसल्याने अखेर झाकीर हुसेन रुग्णालयातील जनरल सर्जन डॉ. नितीन रावते यांना बोलावण्यात आले. ते सुद्धा लगेचच हजर झाले. त्यांनीही रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याने आणि रक्तस्त्राव आटोक्यात येत नसल्याने स्त्री रोग तज्ज्ञ आणि मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांना बोलविण्यात आले. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन उपस्थित डॉक्टरांनी रुग्णाची गर्भपिशवी काढण्याचा निर्णय घेतला. तातडीने गर्भ पिशवी काढण्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यामुळे रक्तस्राव थांबून रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले. रुग्णाची प्रकृती बिकट झाल्याने गुंतागुंतीचे हे ऑपरेशन होते. मात्र सर्व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे महिला रुग्णाचे प्राण वाचल्याचे डॉ. प्रशांत शेटे यांनी सांगितले. आता रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांनी दिली.
इंदिरा गांधी रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. स्नेहल भट आणि आपत्कालीन परिस्थितीत बोलावण्यात आलेल्या मनपाच्या नाशिक रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील भुलतज्ञ डॉ. अर्चना बोधले यांचीही डॉक्टरांना मोलाची साथ लाभली. इंदीरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय देवकर यांनी परिस्थितीचे नियोजन केले. महिला रुग्णाच्या या ऑपरेशननिमित्त सर्व डॉक्टरांचे उत्तम टिमवर्क दिसून आले. यापुढेही सगळ्याच रुग्णांप्रती असाच सेवाभाव असणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटले आहे.