इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील व समाज बांधव यांची आंदोलनस्थळी भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी बसले आहेत त्यांना समाजाचा एक घटक म्हणून पाठिंबा देण्यासाठी आलो असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी या आधीही मध्यस्ती केली. आताही मध्यस्ती करुन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही धस यांनी सांगितले. या मुद्दयावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांची भेट घेणार, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माहिती त्यांनी दिली.
आमदार धस यांनी आमदार प्रकाश सोळके यांच्यासह इतर लोकप्रतिनिधीसह आज भेट घेणार असल्याचेही सांगितले. मनोज जरांगे यांच्या मागणीतील एक निर्णय मान्य करण्यात आला आहे. इतरही मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक आले असून यावर कोणताही निर्णय झाल्याशिवाय ते परत जाणार नाहीत असे सुरेश धस यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांनी मनोज जरांगे नेहमीच मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करतात असा प्रश्न विचारला त्यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असून तेच निर्णय घेणार आहेत. या आधीचे निर्णय त्यांनीच घेतले होते. त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे मनोज जरांगे त्यांच्यावर बोलणार, ते विरोधी पक्षनेत्यांवर कशाला बोलतील. आता हे जास्त न ताणता, लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करु.