मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबई उच्च न्यायालयाने काल मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शन करण्यास मनाई केल्यानंतरही ते आज अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले. जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहचणार आहे. मुंबई दौ-यावर जाताना मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलीला अश्रू अनावर झाले. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
काल न्यायालयाने अधिका-यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्याचवेळी जरांगे यांनी निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबई सारखी पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे असे खंडपीठाने नमूद केले.
या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही कायदा संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत १०० टक्के जाणार, न्यायदेवतेच्या निर्दशनाचे पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल असे ते म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या स्वीय सहाय्यकांकडून मोर्चा रोखण्यासाठी आज प्रयत्न करण्यात आले. स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आले. त्यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखेपाटील हे सुध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या सर्व घडामोडीनंतर मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदावरील आंदोलनासाठी पोलिसांनी परवाणगी दिली आहे. ही परवाणगी सध्या केवळ एक दिवसासाठी असून त्यामध्ये अटीशर्थीही घालण्यात आल्या आहे. आदोलनाची वेळ ९ ते सायंकाळी ६ असणार आहे. त्यानंतर आंदोलकाला थांबता येणार नाही. विशेष म्हणजे या आंदोलनात पाच हजार आंदोलकांना उपस्थिती राहता येणार आहे.